

Operation Tiger Maharashtra, Uddhav Thackeray meeting : महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या एका आमदाराला २० कोटींची ऑफर मिळाल्याचा थेट आरोप संजय राऊत यांनी केला. या एका दाव्याने संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी ऑपरेशन ३.० होणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेतली आहे.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी तातडीने आपल्या शिलेदारांची बैठक बोलावली आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांचा विरोधी पक्षाला खिंडार पाडण्याचा हा नवा डाव आहे का? की ठाकरेंची ही बैठक काहीतरी मोठा उलटफेर करणार का? अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
खासदारांनंतर आता आमदारांमध्ये सुरू असलेल्या बंडखोरीच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पक्षाच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. ही महत्त्वाची बैठक सायंकाळी ७ वाजता मातोश्री बंगल्यात ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव यांचे आणखी काही आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.
सचिन अहिरांच्या जाण्यानं चिंता वाढली
सचिन अहिर यांचे शिंदे गटात जाणे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. पक्षातील सूत्रांनुसार खासदारांप्रमाणेच आमदारही पक्ष सोडून जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी चिंता उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. काही दिवसांपूर्वीच नऊपैकी सहा खासदारांनी बंड करून शिंदे गटात प्रवेश केला होता. या घडामोडीमुळे शिवसेनेची राजकीय ताकद कमकुवत झाली. आता एकनाथ शिंदे यांची नजर उद्धव ठाकरेंच्या उर्वरित आमदार आणि नगरसेवकांवरही असल्याची चर्चा आहे.
मातोश्रीवर कोणत्या विषयांवर चर्चा होणार?
सूत्रांनुसार, मंगळवारच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये खासदारांच्या बंडानंतर आमदारांमध्ये वाढलेली अस्वस्थता, पक्षात संभाव्य फुटीची शक्यता, विधानसभा आणि विधान परिषदेतील पक्षाची रणनीती, पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, सभागृहातील आमदारांची आंदोलने आणि संघटना मजबूत ठेवण्याची रणनीती यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे सर्व आमदारांशी वैयक्तिकरित्या बोलतील आणि पक्षांतर्गत कोणतीही नाराजी किंवा असंतोष समजून घेण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा आहे.
आमदारांनी २० कोटी रुपयांचा प्रस्ताव फेटाळला
काँग्रेस आमदार धीरज लिंगडे यांना शिंदे गटाकडून २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती असा दावा संजय राऊतांनी केला होता. पण आमदार धीरज लिंगडे यांनी राऊत यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लिंगडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाकडून कोणतीही ऑफर मिळालेली नाही. राऊतांनी केलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत असे आमदार लिंगडे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.