ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, तसेच सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करू नका, या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी जालना येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. दरम्यान, राज्य सरकारचं शिष्टमंडळ हाके यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आज जालन्यात आलं. यावेळी ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असं आश्वासन शिष्टमंडळाने दिलं.
आपण उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती देखील शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना केली. मात्र, जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही. तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी बोलताना हाके म्हणाले, "राज्य सरकार म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. दुसरीकडे मराठा आंदोलक म्हणताहेत की आम्ही ओबीसीमध्ये सामील झालो आहोत".
"मग खरं कोण बोलतं? याबाबत नक्की काय ते सरकारने स्पष्ट करावं. आम्हाला सावत्र वागणूक देऊ नये", असंही हाके यांनी म्हटलंय. दरम्यान, शिष्टमंडळ हाके यांच्यासोबत चर्चा करत असताना ओबीसी बांधव आक्रमक झाले होते. त्यांनी सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना शांत केलं. तसेच मराठा समाजाच्या सापडलेल्या ५४ लाख कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी केली. लेखी आदेश दिल्यास मी उपोषण मागे घेईल, असंही हाके यांनी शिष्टमंडळाला सांगितलं. जोपर्यंत सरकारकडून मला लेखी मिळत नाही, तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही, असंही लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर या चार नेत्यांचा समावेश होता. या नेत्यांनी लक्ष्मण हाके यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर त्यांनी हाके यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून चर्चा देखील करून दिली. तुम्ही उपोषण सोडवा आणि मुंबईला या, आपण नक्कीच यावर तोडगा काढू असं फडणवीस यांनी हाकेंना सांगितलं. तरी देखील ते उपोषणावर ठाम आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.