

काळजाचा तुकडा असलेला एकुलता एक मुलगा डोळ्यांसमोरून कायमचा निघून गेला... या दुःखातून सावरणं कोणत्याही आई-वडिलांसाठी सोपं नाही. मात्र अशा दुःखाच्या क्षणीही मोहोळ तालुक्यातील थिटे कुटुंबाने घेतलेला निर्णय अनेकांसाठी आयुष्याची नवी आशा ठरला आहे.
नालबंदवाडीमध्ये नऊ वर्षीय आयुष महेश थिटे याचा ब्रेनडेड झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूचं दुःख बाजूला सारत अवयवदानाचा मोठा निर्णय घेतला. आयुषचं हृदय आणि इतर अवयव दान करण्यात आलं असून त्याचं हृदय आता एका तीन वर्षीय रशियन चिमुकल्याच्या शरीरात धडधडणार आहे. हा चिमुकला रशियातून चेन्नईमध्ये उपचारांसाठी आला आहे. त्यामुळे दान केलेलं हृदय हे एअर एम्ब्युलन्सने चेन्नईला पाठवण्यात येणार आहे.
आयुषचा २३ सप्टेंबर रोजी घरासमोर सायकल चालवताना अपघात झाला होता. त्याला तातडीने स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सोलापूरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी प्रयत्न करूनही आयुषचे प्राण वाचवता आलं नाही. अखेर डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केलं. मुलाच्या निधनाने थिटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
या कठीण प्रसंगी डॉ. प्रसन्न कासेगावकर आणि डॉ. संतोष गुजरे यांनी आयुषच्या पालकांना अवयवदानाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि अवयवदानाची विनंती केली. थिटे कुटुंबाने कोणताही वेळ न दवडता आणि जास्त विचार न करता तातडीने अवयवदानाला होकार दिला. त्यांच्या या निर्णयामुळे आता अनेक रुग्णांना नवजीवन मिळणार आहे.
आयुषचं लिव्हर म्हणजेच यकृत आणि दोन्ही किडनी पुण्यातील दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जीवन-मरणाच्या दारात असलेल्या रुग्णांसाठी तातडीने पाठवण्यात आली आहेत. तर आयुषचं हृदय आणि इतर अवयव डोनेट करण्याची प्रक्रिया शस्त्रक्रिया ‘सीएनएस’ रुग्णालयात करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी डॉक्टरांची चार पथकं काम करत होती. या पथकांमध्ये तब्बल ६० डॉक्टरांचा समावेश होता.
आयुष आज या जगात नाही. मात्र त्याच्या अवयवांमुळे आता चार जणांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण होणार आहे. एका कुटुंबाचं दुःख कायमचं असलं, तरी त्याच कुटुंबाच्या मोठ्या निर्णयामुळे चार कुटुंबांना पुन्हा आनंद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.