संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी
Jalgaon Accident News : हातावरची लग्नाची मेहंदी अजून सुकलीही नव्हती, सासरहून माहेरी जाण्याचा आनंद चेहऱ्यावर होता. पण जळगावात नवविवाहितेवर काळाने क्रूर घाला घातला. एका क्षणात हसतं-खेळतं लग्नघर शोकाकुळ झालं. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोर एक भीषण अपघातात २१ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अवघ्या ६ दिवसांपूर्वीच नववधू बनलेल्या २१ वर्षीय तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वैशाली भाऊसाहेब पाटील असे या मृत नववधूचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत वैशाली पाटील हिचे अवघ्या ६ दिवसांपूर्वीच धुमधडाक्यात लग्न झाले होते. सासरचे विधी आटोपून ती आपल्या काकांसोबत दुचाकीवरून सासरहून माहेरी जात होती. दोघे जळगाव येथील विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना, अचानक एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वैशाली गाडीवरून दूर फेकली गेली आणि गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात दुचाकी चालवणारे नववधूचे काका देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे, अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन चालक गाडी जागेवरच सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत दुर्घटनाग्रस्त चारचाकी वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्र फिरवली आहेत. अवघ्या ६ दिवसांतच नववधूचा असा दुर्दैवी अंत झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.