

पुणे -मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
एक्स्प्रेस वेला पर्यायी रस्ता बांधला जाणार
नेरळ ते शिरूर चौपदरी रस्ता बांधण्याची योजना
सह्याद्रीत नवीन घाटमार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव
राज्यातील पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या पुणे - मुंबई एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला असून या रस्त्यांना पर्यायी रस्ता म्हणून उरण - कर्जत - नेरळ - वांद्रे - पाईट - शिरोली - पाबळ - मलठण - शिरूर या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे सातत्याने राज्य सरकारकडे करत होते. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी देण्यात आली.
फेब्रुवारी महिन्यात मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ झालेल्या टँकर अपघातामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ३२ तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती झाल्यामुळे एक्स्प्रेस वेवरील ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांना एकाच जागेवर ३० तास अडकून राहावे लागले होते. त्यांनतर अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेला पर्यायी रस्ता म्हणून नेरळ ते शिरूर रस्त्याच्या चौपदारीकरच्या कामाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा आणि प्राधान्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलावेत अशी मागणी केली होती.
तसेच नेरळ ते वांद्रे दरम्यानचा भाग हा पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील असून येथे अंदाजे २० किमी लांबीचा घाटमार्ग विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या आवश्यक आहेत. यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारकडे प्राधान्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भविष्यात पुणे - मुंबई, मुंबई - छत्रपती संभाजीनगर, मुंबई - सोलापूर या भागांसाठी कनेक्टिव्हिटी तयार होईलच शिवाय सध्याच्या महामार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
तसंच, 'महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेनुसार सह्याद्री पर्वतरांग ही कोकण आणि महाराष्ट्र पठार यांच्यामधील नैसर्गिक विभाजनरेषा असून कोकण आणि महाराष्ट्र पठार यांना जोडण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घाटमार्ग आहेत. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहणी करताना दोन घाट मार्गांमधील साधारणतः अंतर ते २५ ते ३० किमी असे आहे. परंतु केवळ माळशेज घाट ते बोरघाट या दोन घाटांमधील अंतर हे अंदाजे ६० किमी आहे. त्यामुळे या दोन घाट मार्गांच्या दरम्यान एक पर्यायी घाटमार्ग विकसित केल्यास वाहतुकीकरिता एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.
यामुळे पुणे - मुंबई बरोबरच पुणे - शिरूर, पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव - चाकण - शिक्रापूर या रस्त्यांवरील वाहतुकीची तीव्रता कमी होणार आहे. विशेषतः औद्योगिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण चाकण परिसरातील दीर्घकालीन व गंभीर वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने दिलासा मिळेल.” यावेळी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन या महत्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.