

नीट पेपरफुटी प्रकरणात डॉक्टरला अटक
लातूरचे नीट पेपरफुटी प्रकरणातील कनेक्शन उघड
सीबीआयकडून डॉक्टरला करण्यात आली अटक
या डॉक्टरने मुलासाठी घेतली होती प्रश्नपत्रिका
नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यात चौकशी सुरू असलेल्या डॉ. मनोज शिरूरे यांना सीबीआयने अटक केली. सीबीआयच्या पथकाने डॉ. मनोज शिरूरे यांची लातूरमधील त्यांच्या रुग्णालयात जवळपास ३ तास सखोल चौकशी केली.
नीट पेपर फुटीप्रकरणात आतापर्यंत लातूरमधून पी. व्ही. कुलकर्णी, आरसीसी कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आणि आता डॉ. मनोज शिरुरे यांची नावे समोर आली आहेत. या तिघांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयचा तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे नीट पेपरफुटी प्रकरणातील लातूरचे कनेक्शन अधिकच घट्ट होत चालल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने पेपरफुटी प्रकरणात लातूर येथील बालरोगतज्ज्ञ मनोज शिरुरे यांची कसून चौकशी केली. शिरुरे यांनी यावर्षी नीटची परीक्षा दिलेल्या त्यांच्या मुलासाठी प्रश्नपत्रिका कथितरित्या विकत घेतली होती. बुधवारी रात्री डॉ. शिरुरे यांना सीबीआयच्या पथकाने ताब्यात घेत पुण्यात नेले.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, शिरुरे हे निवृत्त रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि आरसीसी क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांच्या संपर्कात होते. या दोघांचीही सध्या चौकशी सुरू आहे. डॉ. शिरुरे यांच्या मुलाने कथितरित्या आरसीसी क्लासेस व्यतिरिक्त दुसऱ्या संस्थेतून शिकवणी घेतल्या होत्या.
यापूर्वी झालेल्या तपासामुळे आरसीसी क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांना अटक झाली होती आणि निवृत्त रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांची चौकशी सुरू झाली होती. अंतिम प्रश्नपत्रिका निवडण्यापूर्वी तयार केलेले रसायनशास्त्राच्या अनेक प्रश्नपत्रिकांचे संच पी. व्ही. कुलकर्णी यांच्याकडे उपलब्ध होते.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नीट-यूजी २०२६ च्या अंतिम प्रश्नपत्रिकेतील रसायनशास्त्र विभागातील ४५ पैकी ४३ प्रश्न, आरसीसीच्या गेस पेपर्सद्वारे पूर्वी वितरित केलेल्या प्रश्नांशी जुळत होते. तपासकर्त्यांनी दावा केला की, हे कथित पेपरफुटीचे जाळे एका साखळीद्वारे कार्यरत होते. ज्यामध्ये प्रश्नपत्रिकांचे संच मिळवणे, मध्यस्थांमार्फत त्यांचे वितरण करणे आणि अखेरीस परीक्षेपूर्वी निवडक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत त्या पोहोचवणे यांचा समावेश होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.