मोटेगावकर क्लासेसवर पुणे महापालिकेची कारवाई
आवश्यक परवानग्या नसतानाही क्लासेस सुरू
नाशिकमध्येही क्लासेस बंद
NEET पेपरफुटीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ
अक्षय बडवे, पुणे
नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आरोपी शिवराज मोटेगावकरच्या क्लासेसवर अखेर महापालिकेने कठोर कारवाई करत सील ठोकले आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या बोरावके इमारतीत चालणाऱ्या ‘आर.सी.सी. मोटेगावकर’ क्लासेसवर ही कारवाई करण्यात आली. संबंधित इमारतीला अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसताना तसेच अग्निशामक विभागाची ना हरकत प्रमाणपत्र (NOC) नसतानाही क्लासेस सुरू ठेवण्यात येत असल्याची तक्रार समोर आली होती.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महापालिकेने जागामालकाला नोटीस बजावत क्लासेस तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून क्लासेस सुरूच ठेवण्यात आल्याने अखेर महापालिकेने कारवाई करत जागा सील केली.
दरम्यान, या कारवाईचे पडसाद नाशिकमध्येही उमटले आहेत. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील आलिशान इमारतीत सुरू असलेले ‘RCC मोटेगावकर’ क्लास बंद करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयाजवळील नव्या इमारतीत सुरू करण्यात आलेले हे क्लासेसही सध्या बंद असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणात आरोपी शुभम खैरनार याच्या तपासादरम्यान काही खासगी क्लासचालकांची नावे समोर आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नाशिकमधील काही कोचिंग क्लासेस सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या रडारवर असल्याची चर्चा रंगली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात आधीच खळबळ उडाली असताना आता कोचिंग क्लासेसवर होणाऱ्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन आणि तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.