

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळाच चर्चा
कोल्हापुरात शरद पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने चर्चांना उधाण
रणजीत माजगावकर, साम टीव्ही
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट विलीनीकरणावर भाष्य करताना दिसत आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा फेटाळून लावली. त्यानंतर आता कोल्हापुरातून शरद पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील अंतर्गत वादाची कोल्हापुरातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
कोल्हापुरात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज शनिवारी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात झालेल्या या बैठकीत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांमधील अपयशावर चिंतन करण्यात आलं. मात्र या बैठकीत पक्षातील अंतर्गत नाराजीही उघडपणे समोर आली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी बैठकीकडे फिरवली पाठ
काही पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी करत सध्याचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. “साठीतला अध्यक्ष नको, तरुण जिल्हाप्रमुख द्या” अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. विशेष म्हणजे ही महत्त्वाची बैठक सुरू असताना जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
तरुण नेतृत्वाची गरज, कार्यकर्त्यांची मागणी
कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात पक्षाचीही आढावा बैठक झाली.प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळालं नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी केली. त्यांनी पक्षाला तरुण नेतृत्व देण्याची गरज असल्याचं सांगितलं. सध्याचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. दरम्यान, इतक्या महत्त्वाच्या बैठकीला जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष अनुपस्थित राहिल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.