अजय सोनवणे, साम टीव्ही
नाशिक जिल्ह्यातील मनमाडनजीक असलेल्या चांदवड तालुक्यातील दहेगाव लगत असलेल्या एकलव्य वस्ती, सरोदे वस्ती, बिडगर वस्ती, ढोमाडे वस्ती, लोणारी वस्ती आणि जवळील दहेगाव गावामध्ये स्वातंत्र्य कालखंडानंतरही लहान मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी पक्का तर सोडा कच्चाही रस्ता नसल्याने लहान मुलांना चिखल तुडवत शाळेत जावे लागत आहे.
चांदवड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला हे गाव असल्याने स्थानिक आमदार राहुल आहेर हे देखील याकडे दुर्लक्ष करत असून याबाबत गावातील सरपंच पालक तसेच ग्रामस्थांनी अनेकदा लेखी तक्रारी करूनही याकडे प्रशासन तसेच राजकीय मंडळीचे सर्रास दुर्लक्ष असल्याने आपल्या जीवावर उदार होऊन या चिमुकल्याना शाळेत जावे लागत आहे. शासनाने आतातरी आमच्याकडे लक्ष द्यावे व आम्हाला विकसित भारत कसा आहे याचा चेहरामोहरा दाखवावा अशी आर्त हाक या चिमुकल्या मुलांनी लगावली आहे.
दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या गावांमध्ये सुखसुविधा पोहचल्या मात्र, चांदवड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या व मनमाड जंक्शन स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात व वस्त्यांमध्ये अद्यापही रस्तेच पोहचले नसल्याचे विदारक दृश्य बघायला मिळत आहे. या गावामध्ये लहान मुलांच्या शाळेच्या सोयीसाठी व रस्त्यासाठी आजही गावकरी पक्की सडक होईल अशी आशा बाळगून आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्यासाठी जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातुन रस्ता काढत मार्ग काढावा लागत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेकदा लेखी तक्रारी केल्या आहे. मात्र, याकडे त्यांचे दुर्लक्ष असुन कोणीही आमच्याकडे लक्ष देत नसल्याने आम्ही करावे तरी काय असा सवाल या चिमुकल्यांकडून विचारला जात आहे.
आमच्या गावाला उन्हाळ्यात तीव्र पाण्याच्या झळा किंवा पावसाळ्यात दहेगाव आणि वस्त्यांमध्ये येण्या-जाण्यासाठी होणारा त्रास या समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्ते, वीज, पाणी, आरोग्य किमान या पायाभूत सुविधा तरी गावामध्ये असाव्यात याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.