

नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे गावात गोळीबाराची घटना
गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याने श्रावण पिंपळे गंभीर जखमी
नैताळे गावात पाण्याच्या टाकीजवळ भरदिवसा गोळीबार
अजय सोनवणे,साम प्रतिनिधी
पुणे, मुंबईनंतर आता नाशिकमध्ये गोळीबाराची घटना घडल्यानं महाराष्ट्र हादरलाय. गेल्या एका दिवसापासून राज्यात गोळीबाराच्या घटनांचे सत्र सुरू असल्याचं चित्र दिसतंय. पुण्यात न्यायालयाबाहेर एका जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीवर गोळीबार नंतर कोयत्याने हल्ला झाला. या प्रकरणाचा तपास अजून पूर्णही झालेला नाही, तोवर मुंबईतील ज्वेलर्स दुकानावर गोळीबार झाला. या दोन्ही घटनांना 24 तास उलटत नाही तोपर्यंत नाशिक गोळीबाराच्या घटनेने हादरलंय. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोळीबाराची घटना घडलीय.
निफाड तालुक्यातील नैताळे गावात गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आल्याने एक तरुण गंभीर जखमी झालाय. श्रावण सुरेश पिंपळे असे जखमी तरुणाचे नाव असून, गोळीबार केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झालाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रावण सुरेश पिंपळे आणि राहुल वाघमारे हे दोघे नैताळे गावातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली थांबले होते.
त्यांच्यात संभाजीनगरात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. या गोळीबारात श्रावण पिंपळे याच्या पाठीमागील बाजूस कमरेजवळ गोळी लागलीय. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या गोळीबारात श्रावण सुरेश पिंपळे गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला नाशिक येथील मेडीग्राम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
दरम्यान, गोळीबार केल्यानंतर संशयित राहुल वाघमारे (रा. अहिल्यानगर) हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू करण्यात आला आहे.
फरार संशयित राहुल वाघमारे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तपास करत आहेत. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला आणि या घटनेमागील इतर तपशील काय आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, हल्ले आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता आणि कायदा-सुव्यवस्थेवरील नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.