अजय सोनवणे, साम टीव्ही
नाशिकमधील चांदवड तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चुलत बहीणीवर वारंवार अत्याचार केल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला आहे. तालुक्यातील एका गावच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीच्या कोवळ्या वयाचा आणि अज्ञानाचा गैरवापर करत तिच्याच रक्ताच्या नात्यातील नराधमाने तिच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे.
अवघ्या १४ वर्षे १६ दिवस वयाची ही पीडित मुलगी आरोपीची चुलत बहीण आहे. ज्या घरात तिला सुरक्षित असायला हवे होते. त्याच घराने तिचा विश्वासाचा घात केला. नराधम आरोपीने पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवले आणि गोड बोलून प्रेमसंबंधांच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर नराधमाने ९ जानेवारी २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चांदवड तालुक्यातील राहत्या घरात तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले. या पाशवी अत्याचाराचे परिणाम अत्यंत विदारक ठरले. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि अखेर तिने स्त्री जातीच्या नवजात बालकाला जन्म दिला.
खेळण्याच्या वयात बाळ जन्माला घालण्याची ही वेळ त्या कोवळ्या जिवावर ओढवली, हे विचार करूनच अंगावर काटा येतो. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२), ६५(१) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO) २०१२ चे कलम ४, ६, ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सध्या पोलीस उपनिरीक्षक अमोल बी. पवार या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. ज्या वयात खेळ-बाहुल्यांशी खेळायचे असते, त्या वयात एका मुलीला मातृत्वाचा हा विदारक शाप सहन करावा लागला असून, या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशीच संतप्त भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.