भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावर स्थानिक गुंडांनी हल्ला केला
तरुणीची छेड काढल्याचा जाब विचारल्यानंतर आरोपींनी कुटुंबाचा पाठलाग केला
१० ते १५ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून गाडीची तोडफोड आणि मारहाण
पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली असून ३ आरोपी फरार
नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला, असं नाशिक पोलिसांनी अनेक गुन्हेगारांकडून अटकेनंतर वदवून घेतलं. मात्र रस्त्यावरचं वास्तव काही वेगळंच आहे. पर्यटकांवर खुलेआम हल्ले सुरू आहेत आणि पोलीस मात्र झोपलेले आहेत. काय सुरू आहे नाशिकमध्ये? भररस्त्यात गुंडांच्या दहशतीमुळे पर्यटकांमध्ये कशी दहशत पसरलीय? यावरचा साम टीव्हीचा हा विशेष रिपोर्ट.
ही दृश्ये आहेत नाशिकच्या रस्त्यांवर भरदिवसा खुलेआम हल्ला करणाऱ्या गुंडांची. भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर या टवाळखोरांनी गाडीचा पाठलाग करत हल्ला केलाय. मुळात त्याचं झालं असं की, नाशिकमधील भागवत कुटुंब पर्यटनासाठी भावली धरणावर गेलं होतं. मात्र या कुटुंबातल्या एका तरुणीची स्थानिक टवाळखोरांनी छेड काढली. त्यामुळे कुटुंबातल्या काहींना या गावगुंडांना हटकलं आणि वाद झाला. त्यानंतर डूख धरून बसलेल्या गावगुंडांनी भागवत कुटुंबाचा पाठलाग करत थेट त्यांच्या गाडीवरच हल्ला केला. एव्हंढच नाहीतर लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडने गाडी फोडली आणि त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तब्बल 10 ते 15 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ठिकठिकाणी हे हल्ले करण्यात आल्याचं भागवत कुटुंबीयांचं म्हणणंय.
आता या नऊ आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांअंतर्गत कारवाई करण्यात आलीय. मात्र तीन जण अजूनही फरार आहेत. मात्र यामध्ये एक जण हा हत्येच्या गुन्हातला आरोपी आरोपी असून तो जामिनावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे कुटुंबाला अजूनही सुरक्षेचा धोका आहे. दरम्यान, आरोपींकडून केंद्र सरकारच्या आयकर विभागासह अन्य विभागाचे अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आली आहेत. राज्यात पर्यटकांवर हल्ले होण्याची घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच नागपूर-बुटीबोरी मार्गावर एका दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत लाखो रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तर लोणावळ्यातल्या पर्यटकांना तर पोलिसांनीच अपहरण करून लुटल्याची खळबळजनक घटना घडली होती.
खरं तर नाशिक जिल्ह्यात गुंडांचा हैदोस हा नवा नाही. गेल्या वर्षी त्र्यंबकेश्वरमध्ये साधू-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला होता. एवढ्या गंभीर घटना घडूनही पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक नाही. त्यामुळे भर रस्त्यांवर दिवसाढवळ्या नाशिककरांवर हल्ला करण्यापर्यंत या गुंडांची मजल जाते. जोपर्यंत पोलीस झोपलेले आहेत तोपर्यंत असे हल्ले होतच राहणार. त्यामुळे अशा पद्धतीनं पर्यटकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांना आतातरी पोलीसी खाक्या दाखवणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.