

अशोक खरात प्रकरणात नवीन धक्कादायक आरोप समोर
तांत्रिक विधी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप
SIT मार्फत सखोल चौकशी सुरू
कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधात दाखल बलात्कार प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. अशोक खरात यांच्याबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. खरात तांत्रिक विधीसाठी कोल्ह्याचे कान, शिंगचा वापर करायचा असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी केला आहे. भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर करवाई करण्याची मागणी अंनिसने केली आहे.
अंनिसच्या राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले की, कॅप्टन खरात हा भोंदू बाबा शिंग आणून पूजा करत होता. काही उच्चभ्रू लोकांना सुगंधी कस्तुरी देत होता. त्यातून फलप्राप्ती होते असा सांगायचा. त्यामुळे वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याची चौकशी करावी. त्याआधीही आम्हाला अशोक खरातच्या माणसाकडून धमक्या आल्या. आमच्या लोकांवर पिस्तुल रोखले होते. त्यामुळे आता यावर कठोर कारवाई करण्यात यावी. आम्ही काही गोपनीय माहिती आणि नंबर तेजस्विनी सातपुते यांना दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अंनिसचे पदाधिकारी महेंद्र दातरंगे म्हणाले की, २००८ मध्ये आम्हाला याबाबतीत माहिती मिळाली होती. त्यावेळी आम्ही कॅप्टनची भेट घेऊन त्याला सांगितले की, तू भोंदूगिरी करतो. तू डँबिस आहेस. त्यावेळी तो बोलला मी निवृत्त कॅप्टन आहे. माझ्याकडे पिस्तुल आहे, अशी धमकी दिली होती. परंतु त्यावेळी तक्रार दाखल केली नव्हती.
एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खरात याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्धात अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरातला बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला आहे. दरम्यान खरात याला महिलांवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आता १०० पेक्षा जास्त महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.