अमोल कलये, साम टीव्ही
राम मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून हिंदू धर्मीयांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणावर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी कठोर प्रतिक्रिया देत मंदिर व्यवस्थापनाबाबत मोठी मागणी केली आहे. महाराज म्हणाले की, राम मंदिरात झालेली चोरी अत्यंत निंदनीय आहे. गोरगरिबांनी पै-पै जमा करून मंदिरासाठी दिलेला निधी अशा प्रकारे लुटला जाणे ही लोकांच्या भावनांवर आघात आहे. या घटनेत पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली असली, तरी भक्तांच्या मनावर झालेली ठेच भरून निघू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुस्लिम समाजाच्या मशिदी आणि ख्रिश्चनांच्या चर्चप्रमाणे हिंदूंची मंदिरंही त्यांच्या धार्मिक आचार्यांच्या ताब्यात असावीत. त्यासाठी शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य आदींची समिती गठीत करून मंदिरांचा कारभार त्यांच्याकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली.
शासन निधर्मवादी असल्यामुळे धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांची जाण नसते. मंदिर व्यवस्थापनात सरकारी हस्तक्षेपामुळे त्रुटी निर्माण होतात. कर्मचारी व्यवस्थेमुळे चुका होण्याची शक्यता वाढते. मंदिरं आमच्या ताब्यात आली तर त्यांची धार्मिकता अधिक चांगल्या प्रकारे जपता येईल असे ते म्हणाले.
सरकार कारवाई करेल, दोषींना शिक्षा होईल मात्र लोकांच्या भावनांना बसलेली ठेच कोणी भरून काढू शकत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. याच वेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी प्रकरणावरही भाष्य करत म्हटले, केवळ राजीनामा पुरेसा नाही. कठोर कायदे केले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.