पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर: एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार हत्येच्या घटनांमध्ये नागपूरचा देशात दुसरा क्रमांक लागत असतानाच, शहरात पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला आहे. गोकुळपेठ परिसरात केवळ 'रागाने का पाहिले' या क्षुल्लक कारणावरून एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तुषार चुटे (वय २०, रा. दिघोरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तुषार चुटे हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. गोकुळपेठ भागातील कॉफी हाऊस ते लॉ कॉलेज चौक दरम्यान हा थरार घडला. आरोपींच्या गाडीचा टायर तुषारच्या जवळून गेल्याने त्यांच्यात आधी ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला होता. यावेळी तुषारने रागाने त्यांच्याकडे पाहिले, याच कारणावरून आरोपींनी वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि तुषारने एका आरोपीच्या कानशिलात लगावली. याचाच राग मनात धरून दोन्ही अल्पवयीन आरोपींनी तुषारचा पाठलाग केला आणि भररस्त्यात त्याला घेरून चाकूने सपासप वार केले. तुषार रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. जखमी तुषारला तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दोन्ही आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येसाठी वापरलेला चाकू आरोपींनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मागवला होता. भररस्त्यात आणि पोलीस पथक परिसरात तैनात असतानाही ही घटना घडल्याने नागपूरकरांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.