

उमरेडमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या.
किरकोळ वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती.
आरोपी सोहेल ऊर्फ जॉनी शेखला पोलिसांनी अटक केली.
पराग ढोबळे, साम प्रतिनिधी
उमरेड शहरातील कावरापेठ परिसरात एका तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून हत्येमागील कारणाचा तपास केला जातोय. मृत तरुणाचे नाव राजकुमार मारोती पवार (मूळ रा. पाताखोला, मध्य प्रदेश) असे आहे. मृत तरुण उमरेडमधील गांगापूर भागात वास्तव्यास होते. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोहेल ऊर्फ जॉनी शाहिद शेख (२५, रा. कावरापेठ, उमरेड) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येची घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कावरापेठ येथील नगर परिषद दुर्गापूर प्राथमिक शाळेजवळील पानटपरीसमोर येथे घडली. राजकुमार पवार हे त्यांचे मित्र जमिल शेख आणि अन्य एका व्यक्तीसोबत पानटपरीसमोर उभे होते. त्यावेळी आरोपी सोहेल दुचाकीवर तेथे आला. सुरुवातीला गमती-जमतीत संवाद सुरू झाला. मात्र काही क्षणांतच वातावरण तापलं. त्यानंतर आरोपीने सोबत आणलेला कमरेला लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढत राजकुमार यांच्यावर वार केले.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. हल्ल्याची संपूर्ण घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजमध्ये आरोपी दुचाकी उभी करून तरुणांच्या दिशेने जाताना दिसतो. त्यानंतर झालेल्या शाब्दिक बाचाबाचीदरम्यान अचानक चाकू हल्ला करतो. जखमी अवस्थेतही राजकुमार स्वतःची दुचाकी चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य फुटेजमध्ये दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार,आरोपीच्या एका मित्राचा आणि मृत राजकुमार यांचा याआधी काही कारणावरून वाद झाला होता. त्याच वादातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या राजकुमार यांना मित्रांनी तत्काळ उमरेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी जमिल शेख यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला काही तासांत ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण महागावे करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.