

नाफेडच्या कांदा खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा ‘साम टीव्ही’च्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आलाय. नाफेडला कुणी सडका कांदा विकला? कुणाचं उखळ पांढरं झालं? राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अडचणी काही संपता संपत नाहीयेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळत असताना, नाफेडच्या कांदा खरेदीतील घोटाळ्याची पोलखोल ‘साम टीव्ही’नं केलीये.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात नाफेड कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा पुरावाच ‘साम टीव्ही’च्या हाती लागलाय. ‘साम टीव्ही’नं उघडकीस आणलेला नाफेड कांदा खरेदी घोटाळा नेमका काय आहे? ते पाहूयात...
चांदवडमध्ये 3,400 मेट्रिक टन कांदा सडल्याचं दक्षता समितीच्या अहवालात उघड झालंय. नियमांचं उल्लंघन करून A-1 ऐवजी निकृष्ट आणि 36 MM पेक्षा लहान ‘चिंगळी’ कांद्याची खरेदी करण्यात आली. कंपन्यांना कांदा खरेदीचे कुठलेही कायदेशीर पुरावे दाखवता आले नाहीत. या गैरव्यवहारातून सरकारची तब्बल 6 ते 7 कोटींची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या दक्षता समितीनं केलेल्या 211 कांदा चाळींच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आलाय.
या घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर ‘साम टीव्ही’नं नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना गाठलं. त्यांनी या खरेदीला तातडीनं स्थगिती दिली.
कांदा खरेदीतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलीये. नाफेडची कांदा खरेदी बंद करण्याची मागणी करताना, शेतकऱ्यांनी या गैरव्यवहाराला चांदवडच्या तहसीलदारांना जबाबदार धरलंय.
कवडीमोल भाव आणि चाळीत कांदा सडल्यानं आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दर देताना नाफेड आढेवेढे घेते. एवढंच नव्हे, तर कांद्याचे वेगवेगळे निकष लावूनच शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जातो.
नाफेडच्या अधिकाऱ्यांना या सडक्या कांद्यात नेमकं काय दिसलं? सडका कांदा घेऊन कोट्यवधी रुपयांचा मलिदा नाफेडनं नेमका कुणाच्या खिशात घातला? या घोटाळ्यात कुणाचं उखळ पांढरं झालं? याची चौकशी करून दोषींवर कारवाईची गरज आहे. अन्यथा नाफेडच्या माध्यमातून या बड्या धेंडांकडून लूट सुरूच राहणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.