भाजपला सत्तेचा माज आलाय, हा व्हायरस तुम्ही पसरू देताय; राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना रोखठोक पत्र

Raj Thackeray letter Devendra Fadnavis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून भाजपच्या नेत्यांवर सत्तेचा माज आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Raj Thackeray writes letter to Devendra Fadnavis
Raj Thackeray writes letter to Devendra Fadnavis Saam TV AI Image
Published On

Raj Thackeray writes letter to Devendra Fadnavis : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सत्ताधारी भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांवर आणि असंवेदनशीलतेवर जोरदार हल्ला चढवला आहे. "चुका करणाऱ्यांना पाठीशी घालून तुम्ही स्वतःची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात," असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे. 'पॉवर करप्ट्स...' या प्रसिद्ध वाक्याचा दाखला देत, फडणवीसांनी वेडेवाकडे वागणाऱ्यांना जबर शासन करावे आणि स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणे थांबवावे, अशी थेट मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

भाजपला माज आला आहे... आणि तो संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरलाय का? अशा अत्यंत बोचऱ्या आणि थेट शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक जाहीर पत्र लिहून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील घसरत चाललेल्या पातळीवर बोट ठेवत राज ठाकरेंनी भाजप नेत्यांच्या असंवेदनशीलतेवर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. "तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि तुम्ही अवाक्षरही बोलत नाही," असे म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांच्या मौनावरच थेट बोट ठेवल्याने आता राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

Raj Thackeray writes letter to Devendra Fadnavis
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल; मेसेज वाचून अंगावर येईल काटा

राज ठाकरेंचं पत्र जसेच्या तसे, पाहा नेमकं काय म्हणाले...?

प्रति

श्री. देवेंद्र फडणवीस,

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?

देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !

तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.

कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.

मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.

आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही . ( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?

तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.

खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.

तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.

राज ठाकरे ।

Raj Thackeray writes letter to Devendra Fadnavis
Uddhav Thackeray : मध्यरात्री शिंदेंचं ऑपरेशन टायगर अन् ठाकरेंना जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत तडकाफडकी प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com