"दादा, आता विठ्ठलाशी आयुष्यभर भांडण राहील" अमोल मिटकरींचं दिवंगत अजित पवारांना पत्र

Amol Mitkari emotional letter to Ajit Dada : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अमोल मिटकरी यांनी ‘दादा’ यांना उद्देशून भावनिक पत्र लिहिलेय. राजकीय मार्गदर्शक, कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व आणि आयुष्यातील आधारस्तंभ म्हणून दादांची आठवण या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
Amol Mitkari emotional letter to Ajit Dada
Amol Mitkari emotional letter to Ajit DadaSaam TV Marathi
Published On

​।। तिर्थरूप आदरणीय दादांना सप्रेम नमस्कार... ।।

​आदरणीय दादा,

​आज 'व्हॅलेंटाइन डे'! आपल्या प्रिय व्यक्तीप्रती भावना व्यक्त करण्याचा जागतिक प्रेम दिन. तुम्ही समोर असताना कदाचित हे प्रेम व्यक्त करण्याची हिंमत मी करू शकलो नसतो, पण आज तुमच्या अनुपस्थितीत या पत्ररूपी शब्दप्रपंचातून ती व्यक्त करत आहे.

दादा, आषाढी एकादशीची सपत्नीक विठ्ठल महापूजा आपणच करणार, हा विश्वास श्रीक्षेत्र पंढरपूर आणि मला प्रत्येक एकादशीला वाटत आला. जन्मापासून जेव्हा समज यायला लागली, तेव्हापासून विठ्ठल प्राणप्रिय वाटला. माझ्या वडिलांची मिराशी बनलेला हा विठ्ठल आमच्या घरात ३३ कोटी देवांना बाजूला सारून आमचे सर्वस्व बनला होता. तुमच्या आणि सौ. सुनेत्रा वहिनींच्या हस्ते, तुमच्याच कृपेने उभ्या राहिलेल्या माझ्या घरात विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचे स्वप्न होते. काही कारणास्तव आपण येऊ शकला नाहीत, तरी आपल्या परवानगीने वारकरी श्रेष्ठांच्या हस्ते मी सपत्नीक ती मूर्ती देवघरात बसवली. ७ एप्रिल २०२५ ते २८ जानेवारी २०२६ या काळात मी घरात नित्य पूजा, भजन आणि विठ्ठल नामाचा गजर केला. माझ्या घरात पंढरीचे दैवत नांदत होते आणि माझा संसार पुण्यरूप होऊन फळाला येत होता.

मात्र, २८ जानेवारीची दशमी आणि २९ जानेवारीच्या एकादशीने माझ्या कुटुंबावर असा घाला घातला की, आमचा विठ्ठल आम्हाला सोडून गेल्यासारखे झाले. पूर्वी या विठ्ठलाने माझ्या वडिलांना हिरावून नेले, तर आता राजकारणातील माझ्या 'बाप' माणसाला सोबत नेले. पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाची धुळधाण झाली.

​"माझे बुडविले घर । लेकर बाळे दारोदार । लावली काहार । तारातीर करोनी ।।"

​दादा, तुम्ही आपल्यात नाही आहात या शब्दावर माझा विश्वासच बसत नाहीये. हा कदाचित माझा वेडेपणा असेल, पण मन हे वास्तव स्वीकारायला तयार नाही. २०१९ मध्ये तुम्ही माझे म्हणणे ऐकून घेतले, मला पक्षात घेतले, मोठी जबाबदारी दिली, हवाई सफरी घडवल्या आणि आमदार केले. मला केवळ घरच दिले नाही, तर समाजात इज्जत आणि राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली. परदेशवारी घडवली, वडिलांच्या निधनाचे दुःख विसरून मला कामाला लावले, शिस्त शिकवली आणि कामात रमण्याचा मंत्र दिला. तुम्ही मला सर्व काही दिले.

Amol Mitkari emotional letter
Amol Mitkari emotional letterSaam TV marathi

अनेकांसाठी अमोल मिटकरी हा 'अप्रिय' असेल, पण एका सामान्य स्तरातून आलेल्या या व्यक्तीला तुम्ही मात्र आपले मानले. वडिलांनंतर केवळ तुम्हालाच मी प्रिय वाटलो. यापूर्वीही अनेकदा नातेवाईकांनी आणि समाजाने मला दूर लोटले होते. कुटुंबात प्रेमाने बोलणारी ४-५ लहान माणसे सोडली तर कुणी नव्हते. मी वाईट नसतानाही मला वाईट ठरवण्यात आले, पण दादा, केवळ तुम्हीच मला समजून घेतले. माझ्या चुका दुरुस्त करून मला पुढे जायला शिकवले. माझा वाढदिवस असला की पहिला फोन तुमचा असायचा. सुखात आणि दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे तुम्हीच होता.

तुमच्या नावाच्या बळावरच माझी प्रशासकीय 'दादागिरी' आणि राजकीय वाटचाल सुरू होती. मला आमदार करण्याचा तो किस्सा आणि शपथविधीपर्यंतच्या त्या आश्चर्यकारक घटना केवळ आपल्यालाच ठाऊक आहेत. तुमच्यामुळेच मी माझ्या गावाला प्रकाशात आणू शकलो. तुमच्यामुळेच मला गाव, निसर्ग, पशुपक्षी आणि जनतेवर प्रेम करायला शिकता आले. शिव-शाहू-फुले-आंबेडकर ही विचारधारा आपल्यातील समान दुवा होती.

​'स्वराज्यरक्षक' या मुद्द्यावरील आपली ठाम भूमिका उभ्या महाराष्ट्राने पाहिली. "कुणीही जिवाचा न घडो मत्सर" हा संत विचार तुम्ही जगलात आणि "जो जे वांछील तो ते लाहो" हा पसायदानाचा स्वभाव अंगीकारलात, हेच तुमचे वेगळेपण होते!

Amol Mitkari emotional letter
Amol Mitkari emotional letterSaam TV Marathi

​भीमा कोरेगावला दरवर्षी न चुकता अभिवादन करणारा आणि स्वाभिमानाने 'जय भीम' म्हणणारा तो करारी आवाज आता कानावर पडणार नाही, याची सल कायम मनात टोचत राहील. शिववेषात आलेल्या मावळ्याला आपण घातलेला मुजरा, मुस्लीम बांधवांबद्दल असलेले आपले प्रेम आणि जिव्हाळा... आज हे सर्व हरवले आहे.

​आज सांगण्यासारख्या हजारो आठवणी आहेत, पण व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडत आहेत. जनतेने तुम्हाला दिलेली ती साद आज मी पुन्हा देतोय... 'लव्ह यू दादा!' आज तुमची खूप आठवण येतेय. ​भविष्याने माझ्या झोळीत काय वाढून ठेवले आहे, हे माहीत नाही. प्रत्येकाला वाटते की आयुष्याचा शेवट गोड व्हावा, पण तुमच्या नशिबी मात्र निंदानालस्ती आली. आज एकादशी आहे... तुमच्यामुळेच मी विठ्ठलाच्या प्रेमात पडलो होतो, पण त्यानेच याच दिवशी तुम्हाला माझ्यापासून हिरावून नेले. तो विठ्ठल आता मनातून सुटलाय... त्याच्याशी माझे आयुष्यभर भांडण कायम राहील!

जय शिवराय... जय भीम... जय महाराष्ट्र!

​आपलाच,

अमोल मिटकरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com