अक्षय शिंदे, साम टीव्ही
जालना: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंतरवाली सराटी येथे आज मराठा अभ्यासकांची बैठक घेतल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकारने केलेली चूक तात्काळ दुरुस्त करण्याचा इशारा दिला. सरकारने रद्द केलेली प्रमाणपत्रे पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी करत, सरकारने चूक दुरुस्त केली तर आपले संबंध पूर्वीप्रमाणेच चांगले राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत मराठा अभ्यासकांकडून राज्यातील तळागाळातील आरक्षणासंदर्भातील परिस्थितीची माहिती जरांगे पाटील यांनी जाणून घेतली. विविध ठिकाणी निर्माण झालेल्या हरकती, प्रमाणपत्रांचे प्रश्न आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीतील अडचणी याबाबतही त्यांनी मराठा अभ्यासाकांकडून माहिती घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही सवाल उपस्थित केले. सरकारने गॅझेटनुसार प्रमाणपत्रे दिली आणि त्यानंतर तीच प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असेल, तर त्यामागचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच ही प्रमाणपत्रे कोणाच्या इशाऱ्यावर रद्द केली जात आहेत, असा सवालही त्यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये, अशी मागणी करताना जरांगे पाटील यांनी आपल्या समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मला राजकारणाशी काही देणे-घेणे नाही. मात्र, गरीब मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी आमदार प्रसाद लाड यांनी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असल्याचे सांगितले. प्रमाणपत्रे सरसकट रद्द करू नयेत, असा सल्ला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील मराठा समाज बांधवांना तयारीत राहण्याचे आवाहन केले. आपण आपली बाजू घेऊन कुठेही निघू,असे सांगत त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचे सूचक संकेत दिले. तसेच आपल्यालाही एसी बंगल्यांची हवा खायची आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला अप्रत्यक्ष इशाराही दिलायामुळे 29 ऑगस्टच्या . आंदोलनापूर्वी सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या भूमिकेत कोणता बदल करतात, तसेच जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या संकेतांवर प्रशासन काय तयारी करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र आजच्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.