

महायुतीमध्ये वादाची ठिणगी उडाली आहे
मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस थेट इशारा दिला
लोकसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत वेगळा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वेगळी चूल मांडणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगट यांची महायुती फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याची पहिली ठिणगी रायगडमधून पडली आहे. महायुती सरकारमध्ये मंत्रिपदावर असलेल्या शिंदेच्या नेत्याने सहकारी पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीला महायुतीमधून बाहेर पडण्याचा थेट इशारा दिला. मंत्री भरत गोगावले यांनी भविष्यात लोकसभा, विधान परिषद निवडणुकीमध्ये वेगळा विचार करावा लागेल, असे स्पष्टपणे सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले होते. या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. निवडणुका संपल्या तरी काही ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षातील अंतर्गत वाद कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये तर महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आलाच होता. अशामध्ये आता मंत्री गोगावले यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीला पुन्हा इशारा दिला आहे. 'रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये महायुतीने राज्याप्रमाणेच एकत्र येणे गरजेचे असून जर ते एकत्र आले नाही तर भविष्यात लोकसभा, विधानपरिषद आणि अन्य निवडणुकांच्यावेळी वेगळा विचार करावा लागेल.', असे भरत गोगावलेंनी स्पष्ट केले.
रायगडमध्ये शिंदेसेनेला सत्तेपासून लांब ठेवत राष्ट्रवादी आणि भाजप सत्ता स्थापन करत आहेत यावर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला स्पष्ट शब्दात खडेबोल सुनावले. 'त्यांना आमची गरज नसेल तर त्याचा विचार केला जाईल. महतयुतीत एकत्र आहोत तर एकत्र येणे गरजेचे आहे.', असा सल्ला देखील भरत गोगावले यांनी मित्रपक्षांना दिला.
यावेळी भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर देखील प्रतिक्रिया दिली. 'देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाय', अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत दिली. महाडच्या छबिना उत्सवादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. वीरेश्वर महाराजांना भक्तांनी, कार्यकर्त्यांनी साकडं घातल्याचं भरत गोगावले म्हणाले. गेली ५ वर्षे पालकमंत्रिपद हुलकावणी दाखवत असताना देखील गोगावले यांच्या आशावादीपणामुळे एकच हशा पिकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.