संजय राठोड, यवतमाळ प्रतिनिधी
Smart Meter Controversy : यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात महावितरणचा एक अत्यंत धक्कादायक आणि अजब कारभार समोर आला आहे. नांदुरा खुर्द येथील एका ग्राहकाने डिसेंबर महिन्यात नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केला होता. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे घरात अजून स्मार्ट मीटर बसण्याआधीच ग्राहकाला थेट पाच महिन्यांचे वीज बिल हातात पडले आहे.
घरात अद्याप वीज पोहोचली नाही, मीटरचा पत्ता नाही, तरीही जानेवारी महिन्यापासून महावितरण नियमितपणे वीज बिल पाठवत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐनवेळी स्मार्ट मीटरच्या विश्वासार्हतेवर आणि कार्यपद्धतीवरच या प्रकारामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महावितरणच्या या मनमानी आणि ढिसाळ कारभारामुळे वीज ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नांदुरा खुर्द येथील प्रशांत मधुकर महल्ले यांनी नवीन वीज कनेक्शनसाठी बाभुळगाव येथील महावितरण कार्यालयाकडे अर्ज केला होता. दरम्यान, घरात केवळ महिला असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तिथे फक्त 'स्मार्ट मीटर' आणून ठेवले. मात्र, हे मीटर प्रत्यक्षात न बसवता आणि ते सुरू करण्यापूर्वीच जानेवारी ते जून या कालावधीतील वीजबिले ग्राहकाच्या नावे येऊ लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
स्मार्ट मीटर कार्यान्वितच नसताना वीजबिल कशाच्या आधारावर तयार झाले? असा सवाल संबंधित ग्राहकाने उपस्थित केला आहे. आधीच स्मार्ट मीटरबाबत सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात अनेक शंका आणि संभ्रम असताना, मीटर सुरू होण्यापूर्वीच पाच महिन्यांचे बिल येणे ही बाब महावितरणच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून चुकीची बिले रद्द करावीत, तसेच दोषी कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. महावितरणने यावर तातडीने आपली स्पष्ट भूमिका मांडून ग्राहकांमधील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षाही वीज ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.