

IMD yellow alert for Maharashtra districts : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता पुन्हा एकदा हवामानात बदल होत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, घाटमाथा आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
कोठे कोसळणार मुसळधार पाऊस?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, खालील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागात वादळी पावसाचा अंदाज आहे.
अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
पावसाचा जोर वाढण्याचे कारण काय?
हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. याशिवाय, बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची तीव्र प्रणाली (डीप डिप्रेशन) आता जमिनीकडे सरकली असून ती ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरून जमिनीवर आली आहे. या सर्व हवामान बदलांमुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवाहन
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने, विशेषतः घाट रस्ते आणि नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी. शेतकरी बांधवांनी विजांच्या कडकडाटादरम्यान उघड्यावर जाणे टाळावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.