

IMD Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पावसाने हजेरी लावली असली, तरी अनेक ठिकाणी अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज असून उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.
हवामान खात्याने आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. दुसरीकडे मराठवाड्यातही हवामानात बदल पाहायला मिळत आहेत. हिंगोली आणि परभणीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
मंगळवारसाठी हवामान विभागाने पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाटमाथा परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. पालघर, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी हजेरी लावतील.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात अद्यापही जोरदार पावसाची गरज आहे. पावसाने दांडी मारल्यामुळे शेतातील पिकांना फटका बसत असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यातच उन्हाचा चटका आणि हवामानातील दमटपणा वाढल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत.
उत्तर आणि मध्य भारतावरून जाणारा मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या बंगालच्या उपसागराकडे सरकला आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत आणि बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. ही प्रणाली महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातवरून अरबी समुद्राकडे जात असल्याने राज्यातील ठराविक भागातच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.