आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (Vidhan Sabha Election 2024) आपला मुख्यमंत्री व्हावा आणि आपण सत्तेत यावे यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. दोघांनी देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. बैठकांवर बैठका, सभा आणि मोर्चेबांधणी देखील सुरू आहे. अशामध्ये महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्याने मोठं विधान केले आहे. 'आमचं ठरलंय. सत्ता आमची येणार आणि आमचाच मुख्यमंत्री होणार.', असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार हे नागपूर आणि वर्धा दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेक नेते देखील उपस्थित असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अनिल देशमुख हे देखील शरद पवार यांच्यासोबत असणार आहेत. शरद पवारांच्या या दौऱ्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांनी सत्ता आमचीच येणार असल्याचा दावा केला आहे.
अनिल देशमुख यांनी सांगितले की, 'राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार हे सर्वांना माहित आहे. म्हणून इच्छूकांची संख्या वाढली. आमचं ठरलंय. आमची सत्ता येणार. आमचा मुख्यमंत्री होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी एकत्र बसून राज्याचा मुख्यमंत्री ठरवणार आहेत.' तसंच, 'राज्याची निवडणूक ॲाक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होती. पण भाजप सरकार निवडणूक घेण्यासाठी का घाबरते? अजून पुढे ढकलण्याचा त्यांचा विचार दिसत आहे.' असे वक्तव त्यांनी केले.
यावेळी अनिल देशमुख यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. 'भाजप सरकार मनपा, नगर पंचायत निवडणुका घेत नाही आणि आता हे सरकार विधानसभा निवडणूक घ्यायला घाबरतंय. मोठा पराभव होणार म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहेत. अजून किती निवडणुका पुढे जातात हे माहित नाही.', असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसंच, 'पवारसाहेबांनी वक्तव्य केलं होतं की भाजप सरकार केव्हाही दंगली घडवू शकतात. काल नाशिक, संभाजीनगर येथे तशाच प्रकारे कटकारस्ताने दंगली घडवण्याचं आहे? हा प्रश्न निर्माण झालाय. कायदा सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. शांतता रहावी ही गृहखात्याची गरज आहे त्यामुळे त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं.', असे मत त्यांनी व्यक्त केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.