Unseasonal Rain : महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; यवतमाळमध्ये शेतकऱ्यांवर वीज कोसळली

Maharashtra Unseasonal Rain Alert : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अवकाळी संकट कोसळलं आहे. पावसाच्या तडाख्यामुळं शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाली. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना पावसानं झोडपून काढलं. यवतमाळमध्ये वीज कोसळून पाच शेतकरी जखमी झाले.
अवकाळी तडाखा, शेतकरी हतबल
Unseasonal rain and hailstorm lash Vidarbha and Marathwada causing massive crop lossessaam tv
Published On

नापिकी, कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली दबलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अवकाळी संकट कोसळलं आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. कपाशी, ज्वारी, गहू, हरभरा, सोयाबीन, तूर या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. काही भागांत तर गारपीट झाली. यवतमाळमधील एका गावात वीज अंगावर कोसळून शेतकरी जखमी झाले आहेत. दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यांना झोडपलं

चेतन व्यास, वर्धा, साम टीव्ही प्रतिनिधी

वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव परिसराला अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला. या ठिकाणी गारपीट झाली. हिंगणघाट तालुक्यातील काही गावांनाही गारपीट आणि वादळी तडाखा बसला. जवळपास सात ते आठ गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांचं नुकसान झालं आहे. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. त्यानंतर वादळी वारे वाहू लागले. काही वेळाने गारपीट झाले. वेचणीचा कापूस भिजल्याने कपाशीचेही नुकसान झाले. ढगाळ वातावरण कायम असल्यानं शेतकरी चिंतातूर आहेत.

परभणीत अवकाळी

विशाल शिंदे, साम टीव्ही प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसानं हजेरी लावली. गंगाखेड, पालम तालुक्यात पावसामुळं पिकांचे नुकसान झाले. ज्वारीची पिके शेतातच आडवी झाली. गंगाखेड तालुक्यातील गोंडगाव येथे अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे ज्वारी पीकाचे नुकसान झाले. पालम तालुक्यातील बंदरवाडी परिसरात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके भिजून नुकसान झाले. आनंदवाडी, चाटोरी, बोरगाव, खडी, नवा, नवलगाव, कांदलगाव आदी ठिकाणी अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची धावपळ उडाली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

यवतमाळमध्ये वीज कोसळून ५ शेतकरी जखमी

संजय राठोड, साम टीव्ही प्रतिनिधी, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात वीज अंगावर कोसळून पाच शेतकरी जखमी झाले. राळेगाव तालुक्यातील झरगड येथे ही दुर्घटना घडली.

रामचंद्र पचारे, गणेश नने, विमल पदिले, सुनीता राऊत, वंदना पदिले अशी जखमींची नावे आहेत. शेतात काम करत असताना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वीज अंगावर कोसळून पाच जण जखमी झाले. त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले

यवतमाळच्या राळेगाव, मारेगाव, महागाव, आर्णी, उमरखेड, पुसद, दिग्रस तालुक्यात दुपारी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, पालेभाज्या आदी पिकांना मोठा फटका बसला. गहू आणि हरभरा हा सोंगणीला आला होता. गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

वासुदेव झाडे या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतात गहू आणि दोन एकरात हरभऱ्याची लागवड केली होती. या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले अशून, अंदाजे साडेतीन ते चार लाखांचे नुकसान झाले. यावर्षी सुरुवातीला खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांना फटका बसला होता. आता रब्बी हंगामातील पिके निघण्याच्या मार्गावर असताना वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

अहेरीत पाऊस

गणेश शिंगाडे, साम टीव्ही प्रतिनिधी, गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी भागात अवकाळी पाऊस कोसळला. दक्षिणेकडील भागात पावसाने हजेरी लावली. पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपये पाण्यात गेले. शेतातील पांढरं सोनं घरी घेऊन जाण्याची वेळ आली असताना पावसामुळं कापूस भिजून मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

लातूरमध्ये रब्बी पिकांना फटका

संदीप भोसले, साम टीव्ही प्रतिनिधी, लातूर

लातूरच्या रेणापूर, अहमदपूर भागात अवकाळी पाऊस कोसळला. काढणीला आलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. गहू, ज्वारी, आंबा, हरभरा आदी पिकांचं नुकसान झालं आहे. काल उदगीर, जळकोट, निलंगा या भागांत पाऊस पडला होता. संपूर्ण जिल्ह्यात कालपासूनच ढगाळ वातावरण होतं. आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. चांगलं उत्पन्न मिळेल या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

अवकाळी तडाखा, शेतकरी हतबल
Rain Alert : पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये 'उन्हाळ्यात पावसाळा'; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

बीडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

योगेश काशिद, साम टीव्ही प्रतिनिधी, बीड

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. बीड, गेवराई, शिरूर, आष्टी, पाटोदा, परळी, आंबेजोगाई, माजलगाव, केज आदी तालुक्यांमधील शेतीवर अवकाळी संकट कोसळलं. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काढणीला आलेले गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचा यात समावेश आहे.

अवकाळी तडाखा, शेतकरी हतबल
Unseasonal Rain : राज्यावर अवकाळीचं संकट! ४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले, आज कुठे कुठे इशारा?

नांदेडला जोरदार तडाखा

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही प्रतिनिधी, नांदेड

विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं तडाखा दिला असून, मराठवाड्यातील नांदेडला देखील झोडपून काढले. आज संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. हिमायतनगर, कंधार, नांदेड, अर्धापूर आदी तालुक्यांत शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात गहू, हरभरा, ज्वारी, आंबा आदी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोकणातील बळीराजा चिंतातूर

विनायक वंजारे, साम टीव्ही प्रतिनिधी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवस वातावरण पूर्णतः बदलले आहे. कधी धुके, तर कधी ढगाळ वातावरण बघायला मिळते. काल सायंकाळी फोंडाघाटासह परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. आजही सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका आंबा, काजू पिकांना बसू शकतो. त्यामुळं बागायतदारांची चिंता वाढली आहे.

सोलापूरला झोडपले

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही प्रतिनिधी, सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपुर निंबर्गी, विंचूर, कुसुर, खानापूर, तेलगाव आदी भागांत अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास पावसानं हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला. पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यात कलिंगड, गहू, ज्वारी, कांदा, द्राक्ष आदींचा समावेश आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात खते-बियाणांच्या वाढलेल्या किंमती यामुळं कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्याच्या उरलेल्या आशा अवकाळी पावसाने मावळल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com