

ऐन निवडणुकीत ठाकरे गटाला सिंधुदुर्गमध्ये मोठा धक्का.
कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश.
नितेश राणे यांच्या उपस्थितीत हरकुळ खुर्द येथे भव्य सोहळा.
विनायक वंजारे, साम प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड झालीय. ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत अखेर 'मशाल' सोडून 'कमळ' हाती घेतले आहे. रविवारी कणकवलीतील हरकुळ खुर्द येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय. सावंत यांच्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, विविध गावांचे सरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
सतीश सावंत हे एकेकाळी राणे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र मधल्या काळात राजकीय मतभेदांमुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. इतकेच नाही तर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात २०१९ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून सतीश सावंत यांनी निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ते भाजपमध्ये परतले आहेत.
यामुळे कणकवली मतदारसंघात भाजपची ताकद दुपटीने वाढली आहे. एकेकाळी नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर आरोप करत राणेंची साथ सोडली होती. आज सर्व मतभेद विसरून सतीश सावंत यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती घेतलाय. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून सतीश सावंत यांचा सहकार क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्हा बँक, विविध विकास सोसायट्या आणि ग्रामीण भागातील अर्थकारणावर भाजपचे वर्चस्व अधिक घट्ट होईल, अशी शक्यता आहे. सतीश सावंत यांच्यासोबत हरकुळ खुर्दचे सरपंच आनंद ठाकूर, भिरवडे सरपंच नितीन सावंत आणि बेनी डिसोझा यांसारख्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची शिवसेना सोडलीय.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत स्थानिक स्तरावरील मोट मजबूत लागते. मात्र सावंतांसह इतर पदाधिकाऱ्यांनी केल्या पक्षातरांमुळे ठाकरे गटाची स्थानिक फळी खिळखिळी झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच झालेली ही गळती पक्षासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.