

कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
शेतकऱ्यांनी अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराची मागणी केली.
नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले.
कांद्याला किलोला फक्त 50 पैशांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. आता विरोधकही कांद्याच्या दरासाठी रस्त्यावर उतरले आहेत. नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले. सरकारनं नाफेड मार्फत 1235 रुपये क्विंटलनं कांदा खरेदीचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात कांदा लागवडीला क्विंटलला 2 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, त्यामुळे अडीच ते तीन हजारांचा दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. कांदा उत्पादकांच्या काय आहेत मागण्या पाहूयात.
कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित प्रति क्विंटल 3 हजार रुपये भाव द्या
कांद्याला प्रति क्विंटल किमान 1 ते दीड हजार अनुदान द्या
कांद्याला कायमस्वरूपी हमीभाव द्यावा
केंद्रानं राज्यातील 20-25 लाख टन कांदा खरेदी करावा
कांदा निर्यातीबाबत कायमस्वरूपी धोरण तयार करा
कांदा निर्यातीवरील बंदी हटवून निर्यात पूर्ण शुल्क रद्द करा
तर केंद्रानं १२३५ रुपये क्विंटलनं कांदा खरेदी सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. मात्र कांद्याच्या हमीभावासाठी ठाकरेसेनाही आक्रमक झालीये. संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
कष्ट करून पिकवलेला कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आलीये. संभाजीनगरच्या गंगापूर बाजारपेठेत केवळ 1 रुपये किलो भाव मिळाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यानं कांद्याचा पूर्ण टेम्पो रस्त्यावर रिकामा केलाय. दुसरीकडे संगमनेरमध्येही कांद्याला अवघा 1 रुपया भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा पेटवून दिलाय. तर सोलापूरात 43 पोती कांदा विकून एका शेतकऱ्याच्या हातात फक्त 400 रुपये आलेत. कांदा दरावरुन बळीराजा अक्षरशा रडकुंडीला आलाय. त्यामुळे कांद्याला हमीभाव देण्यासाठी सरकार पाऊल उचलणार का? हाच खरा सवाल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.