

Digital Property Card! Chandrashekhar Bawankule : शहरातील प्रत्येक घराला आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. यामुळे आता जमीनीचे वाद कायमचा मिटणार आहे. जमिनीच्या अधिकार अभिलेखांसाठी आता स्वतंत्र डिजिटल कार्ड (Vertical Property Card) असणार आहे. यामुळे राज्यातील जमिनीच्या नोंदणी आणि मालकी हक्कांच्या अभिलेखांमध्ये मोठा बदल होणार आहे. प्रत्येक पात्र सदनिकाधारकाला स्वतंत्र पूरक अधिकार अभिलेख देण्याचा प्रस्ताव आहे. ग्रामीण भागातील जमिनींसाठी ७/१२ उताऱ्याप्रमाणेच नगर भूमापन क्षेत्रातही स्वतंत्र नोंदीची व्यवस्था करण्यात येणार आहे. (Maharashtra digital property card scheme for flat owners)
सध्या ग्रामीण भागात जमिनींसाठी ७/१२ उतारा तर नगर भूमापन क्षेत्रात मिळकत पत्रिका उपलब्ध आहे. मात्र इमारतीतील प्रत्येक सदनिकेच्या हक्कांची स्वतंत्र व एकसमान नोंद करण्याची स्पष्ट व्यवस्था सध्या नाही. त्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत इमारतीतील सदनिकांचे अधिकार अभिलेख व नोंदवह्या तयार करण्यासाठी २०२६ चे नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत.
या प्रस्तावित व्यवस्थेनुसार, प्रत्येक सदनिकेचा क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, संबंधित हक्क, बोजे तसेच इमारतीचे व खुल्या जागांसह रस्त्यांखालील सामाईक क्षेत्राची स्वतंत्र नोंद केली जाईल. मसुदा नियमांवर ३० दिवसांत हरकती व सूचना मागविण्यात येणार असून, त्यानंतर त्यांचे परीक्षण करून नियम अंतिम केले जातील. पुढे प्रायोगिक अंमलबजावणी करून या योजनेचा टप्प्याटप्प्याने राज्यभर विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे.
व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड (सदनिकानिहाय अधिकार अभिलेख) तयार करणे
प्रस्तावाचा उद्देश: जमिनीच्या अधिकार अभिलेखासोबतच इमारतीतील प्रत्येक पात्र सदनिकेची ओळख, क्षेत्रफळ, धारक तसेच संबंधित हक्क व बोजे दर्शविणारा स्वतंत्र पूरक अधिकार अभिलेख तयार करणे.
सद्यःस्थिती: ग्रामीण भागात जमिनीसाठी ७/१२ उतारा आणि नगर भूमापन क्षेत्रात मिळकत पत्रिका उपलब्ध आहे. मात्र, प्रत्येक सदनिकेच्या हक्कांची स्वतंत्र व राज्यभर एकसमान पद्धतीने नोंद करण्याची स्पष्ट व्यवस्था सध्या नाही.
प्रस्तावित नियम: महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत इमारतींमधील सदनिकांचे अधिकार अभिलेख व नोंदवह्या तयार करणे आणि त्या सुस्थितीत ठेवण्याबाबतचे नियम, २०२६ प्रस्तावित आहेत.
अभिलेखांची रचना: प्रथम इमारत व सामाईक क्षेत्रांचा मुख्य अभिलेख आणि त्यानंतर प्रत्येक सदनिकेचा स्वतंत्र पूरक अभिलेख तयार केला जाईल.
प्रस्तावित नमुने:
नगर भूमापन क्षेत्रात: इमारतीसाठी D-१ आणि प्रत्येक सदनिकेसाठी D-२
ग्रामीण व इतर क्षेत्रांत: इमारतीसाठी I-A (गाव नमुना ७-क) आणि सदनिकेसाठी I-B (गाव नमुना ७-ड)
नोंदविण्यात येणारा तपशील: सदनिका क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, संबंधित हक्क आणि बोजे तसेच मंजूर आराखड्यातील इमारतीचे क्षेत्र, खुली जागा, रस्त्यांखालील क्षेत्र आदी सामाईक क्षेत्र यांचा समावेश असेल. प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाईल.
पात्रतेचे निकष: मंजूर बांधकाम आराखडा, संबंधित प्रमाणपत्रे व नोंदणीकृत दस्तऐवजांच्या पडताळणीवर नोंदी आधारित असतील आणि त्या अंतिम मंजूर आराखड्याच्या मर्यादेतच घेतल्या जातील.
अभिलेख सुरू करण्याचा टप्पा: नवीन प्रकल्पांसाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि विद्यमान इमारतींसाठी भोगवटा प्रमाणपत्र व नोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे नोंदी करण्याचे प्रस्तावित आहे.
अर्जदार व कागदपत्रे: जमीनधारक, प्रवर्तक, विकासक, सदनिकाधारक किंवा संस्थेची अधिकृत व्यक्ती अर्ज करू शकेल. प्रकरणानुसार मूळ अधिकार अभिलेख, मंजूर आराखडा, संबंधित प्रमाणपत्रे, अभिहस्तांतरण किंवा मानीव अभिहस्तांतरण दस्त आणि सदनिकेच्या हक्कांचे नोंदणीकृत दस्त आवश्यक असतील.
बोजे व देणी: बँक कर्ज, गहाण, मालमत्ता कराची थकबाकी, संस्थेची देणी, न्यायालयीन निर्बंध व शासकीय देणी यांची लागू प्रक्रिया आणि सक्षम प्राधिकरणाच्या आदेशा अथवा प्रमाणित माहितीच्या आधारे सदनिकानिहाय नोंद प्रस्तावित आहे.
ऑनलाइन कार्यपद्धती : अर्ज, माहिती संकलन, स्वयंचलित छाननी, आवश्यक स्थळपडताळणी, त्रुटींची पूर्तता, अभिलेख मंजुरी आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त कार्ड वितरणासाठी एकात्मिक प्रणाली विकसित केली जाईल.
API आधारित एकत्रीकरण: नोंदणी व मुद्रांक विभाग, सहकार विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, नियोजन प्राधिकरणे, महारेरा आणि भूमि अभिलेख प्रणालींमध्ये कालबद्ध डिजिटल माहितीची देवाणघेवाण प्रस्तावित आहे.
पुनर्विकासातील नोंदी: इमारत पाडणे, पुनर्विकास किंवा पुनर्बाधणी झाल्यास जुन्या नोंदी नियमानुसार बंद अथवा अद्ययावत करून नवीन मंजूर आराखड्यानुसार अभिलेख तयार केले जातील.
कायदेशीर व प्रशासकीय सुधारणा: संबंधित सहकार, सदनिका मालकी, अपार्टमेंट मालकी, नगरपालिका व नगररचना कायदे आणि नियमांत आवश्यक सुधारणा तसेच समन्वयासाठी आंतरविभागीय समिती आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयात स्वतंत्र प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (SPMU) प्रस्तावित आहे.
पुढील कार्यवाही: मसुदा नियमांवर ३० दिवसांत हरकती व सूचना मागविणे, त्यांचे परीक्षण करून नियम अंतिम करणे, प्रायोगिक अंमलबजावणी करणे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभर विस्तार करणे प्रस्तावित आहे.
अपेक्षित लाभ: सदनिकांच्या हक्कांची पडताळणी, खरेदी-विक्री व कर्ज प्रक्रिया सुलभ होणे, बोजे व थकबाकीची पारदर्शकता वाढणे, फसवणूक व वाद कमी होण्यास मदत होणे आणि शासकीय अभिलेख अद्ययावत राहणे अपेक्षित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.