
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात दणदणीत विजय मिळवला आहे. लवकरच महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. भाजपनं गटनेतेपदी त्यांची निवड केली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार असल्याचं निश्चित झालं आहे. फडणवीस यांची आजवरची राजकीय कारकीर्द त्यांच्यासाठी सुवर्णकाळ ठरली आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्री ते पुन्हा उपमुख्यमंत्री आणि आता जोरदार कमबॅक करत पुन्हा मुख्यमंत्रिपदी ते विराजमान होणार आहेत.
नगरसेवक ते मुख्यमंत्री (Devendra Fadnavis Political Career)
देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर महापालिकेचे नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. नगरसेवक होण्यापासून ते नागपूरचे सर्वात तरूण महापौर बनलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते म्हणून आपले स्थान अधिकच भक्कम केलंय. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्व पाहून त्यांचे बालपणीचे मित्र विवेक रानडे यांनी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. देवेंद्र फडणवीसही त्यासाठी तयार झाले होते. 2006 ला त्यांनी नागपुरातील एका कपड्याच्या दुकानासाठी फोटोशूटही केलं होतं.
मोदी-शहांचा विश्वास
2014 च्या विधानसभा निवडणुकीपासूनच फडणवीस हे अधिक चर्चेत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा विश्वास संपादन केला. एका निवडणूक सभेत मोदींनी फडणवीसांना 'नागपूरची देशाला भेट' असे संबोधले आणि अशा प्रकारे फडणवीसांवर विश्वास व्यक्त केला. 2014 च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोदींनी जोरदार प्रचार केला असला तरी, निवडणुकीत पक्षाच्या अभूतपूर्व विजयाचे काही श्रेय त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या फडणवीस यांनाही गेले.
सर्वात तरूण महापौर
देवेंद्र फडणवीस हे जनसंघाचे आणि नंतर भाजपचे नेते दिवंगत गंगाधर फडणवीस यांचे पुत्र आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी तरूण वयात राजकारणात प्रवेश केला. जेव्हा ते 1989 मध्ये संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. वयाच्या 22 व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक झाले आणि 1997 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी सर्वात तरुण महापौर झाले. फडणवीस यांनी 1999 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या.
राजकीय धक्का
फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांप्रमाणे फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोपही झाला नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांना मोठा राजकीय धक्का बसला होता. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर भाजप-शिवसेना युती तुटली.
23 नोव्हेंबर 2019 रोजी फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी विधानसभेच्या फ्लोअर टेस्टपूर्वीच २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. काही महिन्यांनी एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बहुमताअभावी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. पुढे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
विरोधी पक्षनेतेपद
फडणवीस यांना राजकीय वारसा आहे. पण तरीही फडणवीस यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख महाराष्ट्रातच काय तर देशाच्या राजकारणात निर्माण केली आहे. त्यांच्यासमोरही अनेक आव्हाने होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांच्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना वेगळी झाल्यावर, त्यांनी अजित पवारांसोबत पर्यायी युती करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. शपथविधीही झाला. पण हे सरकार अल्पायुषी ठरले, ते अवघ्या ७२ तासांनंतर पडले. यानंतर फडणवीस यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पाडली.
उपमुख्यमंत्री ते आता पुन्हा मुख्यमंत्री (Devedra Fadnavis Deputy CM To CM journey)
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतानाच पक्षवाढीवरही भर दिला. त्याची प्रचिती २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आली. भाजपला सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळाला. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अशी कामगिरी कोणत्याच पक्षाने केली नव्हती. भाजपच्या या यशाचं श्रेय महाराष्ट्रातील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांना जातं. आता 'मी पुन्हा येईन' ही त्यांनी केलेली घोषणा खरी ठरली आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा विराजमान होणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.