
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रासह देशाला पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत. उद्या, गुरुवारी ५ डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. भाजपच्या कोअर कमिटीमध्ये फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्रातून आलेल्या दोन निरीक्षकांच्या उपस्थितीत आज विधिमंडळ बैठकीपूर्वी कोअर कमिटीची बैठक पार पडली.
या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सर्व प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी सहमती दिली. गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, भारतीय जनता पक्षाचे विधानमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''माझ्यापेक्षा भारताचं संविधान सर्वात महत्त्वाचं आहे आणि एक असं संविधान की ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा, मोठं होण्याचा अधिकार दिला आणि भारताला जगातलं एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं. अशा या संविधानाच्या ७५ वर्ष पूर्ण होण्याऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा सरकार स्थापन करतोय. आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता असेलच; पण त्याचसोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी कार्यरत राहायचं आहे.''
५ डिसेंबरला आझाद मैदानात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य शपथ घेणार आहेत. यासंबंधीची निमंत्रणपत्रिकाही व्हायरल होत आहे. शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्यदिव्य तयारी करण्यात आलेली आहे. सोहळ्यासाठी तीन वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.