
मुंबई : परभणी हिंसाचारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यभरातील विविध भागात आंदोलकांकडून रास्ता रोको, निदर्शने करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईच्या चेंबूर, पवईमध्ये तीव्र पडसाद उमटले. या भागातील आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको करत आंदोलन केले. त्यामुळे चेंबूर कॉलनी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. या आंदोलनात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर परिसरात दुकाने बंद असल्याचे पाहायला मिळाली. यावेळी आंदोलक आणि एका दुकानदाराशी वाद झाल्याचेही पाहायला मिळाले.
परभणी घटनेवरून उल्हासनगरात आरपीआय आठवले गटाने बंदचे आवाहन केले होते. आरपीआय शहराध्यक्ष नाना बागुल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या बंदच्या आवाहनानंतर शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक ते पाच मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. मात्र जनजीवन कुठेही विस्कळीत झाले नाही. त्यामुळे या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला दिसून आला. सदर घडलेल्या घटनेविरोधात उपविभागीय कार्यालयात निवेदन सुद्धा देण्यात आले.
परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यानुसार आज बारामतीत व्यापाऱ्यांनी दुकाने शंभर टक्के बंद ठेवून या बंदला १०० टक्के प्रतिसाद दिला. आज दुपारी बारापर्यंत ही दुकाने बंद ठेवली होती. त्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले.
आज महाराष्ट्र बंदला छत्रपती संभाजीनगरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला होता. सध्या जिल्ह्यात वाहतूक सुरळीत आहे. काही दुकाने उघडली आहेत, तर काही बंद आहेत.
परभणीतील आंदोलनकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर पूर्णा येथे रॅली काढत निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर दुपारनंतर कार्यकर्त्यांकडून दुकाने सुरु करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनानंतर शहरातील सर्व दुकाने उघडण्यात आली.
परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज विविध संघटनेच्या माध्यमातून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या बंदला बीड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर बीडच्या माजलगाव, वडवणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. माजलगाव शहरातील बस स्थानकामधून एसटी बसची वाहतूक बंद केली आहे. तर दुसरीकडे बीड शहरात समिश्र बंद असल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी मार्केट उघडे तर मुख्य बाजारपेठेत मार्केट अद्याप बंद असल्याचं पाहायला मिळत आहे.
परभणी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. अमरावतीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा निषेध केला. तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करून पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. दरम्यान, सरकार निदर्शने करत सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
परभणी आणि बीड प्रकरणात राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी बुलढाण्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. परभणी प्रकरणात पोलीस कोटडीत असलेल्या तरुणांचा मृत्यू होतो. त्या तरुणाची हत्या होते, हे सरकार कसं खपवून घेते, असा सवाल उपस्थित जयश्री शेळके यांनी केला. राज्य सरकार शपथविधी आणि मंत्रिमंडळत मशगुल आहे. राज्य पेटतंय याकडे दुर्लक्ष केल्या जातात, असा आरोप महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांनी केलाय. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ लातूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. लातूरच्या ग्रामीण भागातही याचे पडसाद पाहायला मिळाले. अहमदपूर,मुरुड, रेनापुर या भागात देखील आंबेडकरी आणि संविधानवादी पक्ष-संघटनाच्या वतीने बंद करण्यात आला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय व्यापारी संकुल, बंद करत व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आणि सोमनाथ सुर्यवंशी या भीमसैनिकांच्या मृत्यूची चौकशी करावी, या मागणीसाठी नाशिकच्या मनमाडमध्ये डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समस्त भीमसैनिकांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी रोष व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.