महाबळेश्वर एसटी बसस्थानकात बस उशिराने सुटल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी
वाहतूक निरीक्षक शाहरुख बशीर खान गैरवर्तन केल्याचा आरोप
पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद
अधिकाऱ्याचे निलंबन
ओंकार कदम, सातारा
साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. महाबळेश्वर येथील एसटी बसस्थानकात प्रवासी आणि स्थानिक पत्रकारांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी वाहतूक निरीक्षक शाहरुख बशीर खान यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सातारा विभाग नियंत्रक यांनी ही कारवाई केली असून, या निर्णयामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर बसस्थानकातून सुटणारी एक एसटी बस तब्बल एक तास उशिराने रवाना होत होती. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी बस उशिराने का सुटत आहे, याबाबत वाहतूक निरीक्षकांकडे विचारणा केली. मात्र, समाधानकारक उत्तर देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्याने प्रवाशांशी उर्मटपणे वागल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काही स्थानिक पत्रकार बसस्थानकात पोहोचले आणि त्यांनी बस उशिरा सुटण्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांनी पत्रकारांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरत “पत्रकार हे ब्लॅकमेलर आणि दलाल आहेत” असा वादग्रस्त शब्दप्रयोग केल्याचे सांगितले जाते. या वक्तव्यामुळे पत्रकार आणि उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या घटनेनंतर बसस्थानक परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रवासी, पत्रकार आणि स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तनाचा निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. सार्वजनिक सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारचे वक्तव्य आणि वर्तन अयोग्य असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेतली. प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सातारा विभाग नियंत्रक यांनी शाहरुख बशीर खान यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. कारवाईची माहिती समोर येताच प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे एसटी प्रशासनाच्या कामकाजाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रवाशांना वेळेवर आणि पारदर्शक सेवा देण्याची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.