फ्लाय 91 चा कंपनीचा मोठा निर्णय
सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद विमानसेवा बंद
19 जूनपासून या दोन्ही मार्गांवरील तिकीट विक्री बंद
विमानसेवा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! सोलापूरकरांसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद विमानसेवा पुढील ३ महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मान्सूनमुळे निर्माण होणाऱ्या हवामानाचा विचार करून फ्लाय 91 कंपनीने हा निर्णय घेतला असून १९ जूनपासून या दोन्ही मार्गांवरील तिकीट विक्रीही थांबवण्यात येणार आहे.
फ्लाय 91 कंपनीच्या माहितीनुसार, सोलापूर विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत विमानसेवा सुरक्षितपणे चालवणे कठीण ठरत आहे. यामुळे सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद या दोन्ही मार्गांवरील उड्डाणे किमान दोन ते तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या विमानसेवेला सोलापूरसह लातूर, धाराशिव, विजयपूर आणि कलबुर्गी परिसरातील प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. कमी वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने या मार्गावरील प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत होती. वाढत्या मागणीमुळे काही वेळा तिकिटांचे दर तब्बल 10 हजार रुपयांपर्यंत पोचल्याचेही पाहायला मिळाले. मात्र मान्सूनच्या काळात वारंवार हवामानातील बदल, कमी दृश्यमानता आणि उड्डाणांमध्ये होणारा उशीर यामुळे विमानसेवा विस्कळीत होण्याचे प्रकार घडले होते. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कंपनीने तात्पुरती सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, विमानसेवा बंद असली तरी सोलापूर विमानतळावरील फ्लाय 91 कंपनीची यंत्रणा आणि कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. फ्लाय 91 चे प्रमुख मनोज चाको यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती अनुकूल राहिल्यास सेवा अपेक्षेपेक्षा लवकर सुरू होऊ शकते. अन्यथा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापासून सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद विमानसेवा पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गांवरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.