FDA raids food stores across Maharashtra September : सणासुदीच्या काळात तुम्ही बाजारातून आणलेला खवा, मावा, पेढा किंवा ऑनलाईन मागवलेले खाद्यपदार्थ खात असाल, तर सावध व्हा. कारण, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात धडक कारवाई करत १ कोटी ३६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा संशयास्पद, भेसळयुक्त आणि अस्वच्छ अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. १७ ते २० सप्टेंबर २०२६ दरम्यान राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत खाद्यपदार्थांमधील भेसळ, अस्वच्छता आणि नियमभंगाचा मोठा पर्दाफाश झाला आहे.
उंदरांचा वावर अन् कीटकांचा सुळसुळाट
मुंबईतील नामांकित कंपन्या आणि प्रसिद्ध आस्थापनांमध्ये एफडीएच्या पथकाने टाकलेल्या धाडीत धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. बॅलार्ड इस्टेट येथील Swiggy Instamart च्या डार्क स्टोअरमध्ये थेट जिवंत उंदीर, उंदरांनी कुरतडलेल्या तांदळाच्या पिशव्या आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळल्याने त्यांचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. याशिवाय, कांदिवली येथील Amazon साठी कार्यरत असलेल्या 'Acculogicx Supply Chain Solutions' च्या गोदामातही स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
इतकेच नव्हे तर, मुंबईतील प्रसिद्ध 'सुलेमान उस्मान मिठाईवाला' (मोहम्मद अली रोड), 'जैन स्वीट अँड भेलपुरी हाऊस' (कांदिवली), 'सद्गुरू स्वीट्स' (मालाड), 'गो ग्रीन फूड हॉस्पिटॅलिटी' (घाटकोपर) आणि 'स्वाद स्नॅक्स कॉर्नर' (लालबाग) यांसारख्या अनेक ठिकाणच्या अस्वच्छ वातावरणामुळे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातही एफडीएने जोरदार कारवाई केली. सुमारे ३२,०२३ किलो/लिटर इतका भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला असून यात खवा, मावा, पेढा, तूप, तेल, गूळ आणि सुकामेवा यांचा समावेश आहे. मिरज एमआयडीसीमध्ये रु. ६.५३ लाखांची संशयास्पद हळद पावडर जप्त करण्यात आली आहे. याशिवाय, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात राज्यभरात १४ एफआयआर (FIR) दाखल करून १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १.३८ कोटी रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि वाहने जप्त करण्यात आली.
महाराष्ट्रात जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. अस्वच्छ व भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा कडक इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. खाद्यपदार्थांच्या तक्रारीसाठी नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.