संजय महाजन | जळगाव प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी
जळगावात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेचे केवायसी (KYC) करण्याच्या बहाण्याने एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी गोकुळ रमेश चव्हाण (वय ३८) याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षाचा गोकुळ चव्हाण हा शहरात ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र चालवतो. तो स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेतो. या घटनेतील पीडित महिला 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया करत होती. 'तुमच्या योजनेचे केवायसी करायची आहे' असे सांगून चव्हाण महिलेच्या घरी गेला. तेथे कागदपत्रे पडताळणीच्या बहाण्याने त्याने महिलेकडे थेट शरीरसुखाची मागणी केली.
चव्हाण इतक्यावर थांबला नाही. तर त्याने एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणीही केली होती. चव्हाण याने दुसऱ्या एका महिलेला तिचे बंद पडलेले 'निवृत्ती वेतन' पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवले. त्या बदल्यात त्याने तिच्याकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याचेही पोलीस फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर जळगावसह राज्यात संतापाची लाट उसळळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा नराधमावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. "सरकारी योजनांच्या नावाखाली महिलांची अडवणूक आणि छळ करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी." अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.
जळगाव शहर पोलिसांनी आरोपी गोकुळ चव्हाण विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी चव्हाण पसार झाला आहे. जळगाव शहर पोलिसांकडून चव्हाण याचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली आहेत. पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना ईकेवायसीची अखेरची संधी देण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत ईकेवायसी दुरूस्ती करता येणार आहे.
ई-केवायसीची जाचक अट रद्द करा
सरकारने 'लाडकी बहीण योजना' आणली खरी, मात्र निवडणुका होताच लाभार्थ्यांचा आकडा कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. ई-केवायसीची जाचक अट लादून सरकारने तब्बल ७५ लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले आहे. याच जाचक अटीचा गैरफायदा घेत जळगावमध्ये केवायसीसाठी गेलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला व बालविकास विभागाने ही अट त्वरित रद्द करावी. जेणेकरून भविष्यात कोणत्याही महिलेला अशा संकटाचा सामना करावा लागणार नाही, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.