रणजीत माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी
Kolhapur Latest News : कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एक महिन्याच्या चिमुकलीचे बारसे होण्यापूर्वीच तिच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजारामपुरी परिसरातील अस्मिता प्रतीक काटकर यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याचे समोर आले. मात्र, हा आत्महत्येचा प्रकार नसून हुंड्यासाठी छळ करून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप अस्मिताच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.
राजारामपुरी परिसरात राहणाऱ्या अस्मिता प्रतीक काटकर यांचा काल दुपारी संशयास्पद मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अवघ्या एक महिन्याच्या मुलीच्या बारशाची तयारी घरात सुरू असतानाच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मात्र, या घटनेनंतर अस्मिताच्या माहेरच्यांनी गंभीर आरोप केले आहेत. लग्नापासूनच रोख रक्कम, सोने आणि ऑनलाइन व्यवहारातून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. मुलीच्या बारशासाठी ५२ हजार रुपयांचा पाळणा आणि इतर खर्चासाठीही तगादा लावण्यात आला होता. तसेच मुलगा न झाल्यामुळे अस्मिताचा मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप तिची आई संगीता सरदेसाई यांनी केला आहे.
या प्रकरणी अस्मिताचे वडील आणि मामांनीही सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, राजारामपुरी पोलिसांनी पती प्रतीक काटकर, सासू मनीषा काटकर, सासरे वीरेंद्र काटकर आणि नणंद अशा चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी प्रतीक काटकर, मनीषा काटकर आणि वीरेंद्र काटकर यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
कायद्याची परिस्थिती लक्षात घेता अस्मिता काटकर यांच्यावर कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.