यावल तालुक्यातील हरिपुरा धरणात १७ वर्षीय जयेश फेगडेचा बुडून मृत्यू
पोहताना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुडाला
घटनेमुळे फेगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
संजय महाजन, जळगाव
जळगावच्या यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या हरिपुरा धरणात बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सदर घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जयेश संजय फेगडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश हा आपल्या चुलत भावासह आणि वहिनीसोबत सातपुडा पर्वतरांगांतील हरिपुरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. पावसाळ्यात धरण परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागात भेट देत असतात. जयेश आणि त्याचे नातेवाईकही याच उद्देशाने तेथे गेले होते.
धरण परिसरातील रम्य वातावरणाचा आनंद घेत असताना जयेशला पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने धरणाच्या पाण्यात उतरून पोहण्यास सुरुवात केली. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो काही क्षणांतच खोल पाण्यात गेला. त्याला पाण्यात बुडताना पाहताच त्याच्या नातेवाईकांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि उपस्थित पर्यटकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर जयेशला पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर जयेशचा मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे फेगडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.