संजय महाजन, साम टीव्ही
जळगाव : कामाच्या शोधात महाराष्ट्रातील जळगाव येथून गुजरातच्या सुरत जिल्ह्यात निघालेल्या एका कुटुंबावर वाटेतच भीषण संकट कोसळले. सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ चार जणांनी या कुटुंबाला अडवून कालव्याच्या खोल पाण्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या क्रूर घटनेत कुटुंबातील आई-वडिलांसह तिघांचा मृत्यू झाला असून, १३ वर्षीय मुलगा चमत्कारिकरीत्या बचावला आहे. कुटुंबातील अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथे वास्तव्यास असलेले हे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. कुटुंबातील नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील हे एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होते. अधिक काम मिळविण्याच्या उद्देशाने ते २१ नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांसह सुरतच्या दिशेने प्रवासाला निघाले होते.
सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ पाटील कुटुंबाची गाडी पोहोचली असता, दुसऱ्या एका कारमधून आलेल्या चार व्यक्तींनी त्यांच्या वाहनासमोर गाडी आडवी लावून त्यांना अडवले. त्यानंतर आरोपींनी कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने वाहनातून बाहेर काढले आणि कालव्याच्या खोल पाण्यात फेकून दिल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबातील सदस्यांना स्वतःचा जीव वाचविण्याची संधीही मिळाली नाही. आरोपींनी संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले.
या भीषण घटनेत कुटुंबातील १३ वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत कालव्याच्या आत असलेल्या एका पाईपला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्यापासून बचावला. काही वेळानंतर त्याने कालव्यातून बाहेर पडत जवळच्या एका हॉटेलमध्ये धाव घेतली. तेथे त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आणि घटनेची माहिती प्रशासनाला मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कालव्यात शोधमोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान महुवा तालुक्यातील डुंगरीजवळ कालव्याच्या पाण्यात तीन मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचा समावेश आहे. नातेवाईकांनी मृतदेहांची ओळख पटवली असून, पुरुषाचे नाव नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील आणि महिलेचे नाव कविता पाटील असल्याचे समोर आले आहे. कविता पाटील यांच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या नितीन पाटील यांच्यासोबत राहत होत्या.
कुटुंबातील प्रथमेश पाटील आणि हरीश पाटील ही दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून कालव्याच्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. दोन मुलांचा शोध लागेपर्यंत ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार असून, त्यांच्याबाबतची माहिती मिळविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खंडियो, अभो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुरत ग्रामीण पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हत्येचा संशय व्यक्त केला आहे. संपूर्ण कुटुंबाला लक्ष्य करण्यामागील कारण काय, आरोपींचा या कुटुंबाशी नेमका काय संबंध होता आणि हा प्रकार पूर्वनियोजित होता का, याचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ स्वतंत्र पथके तयार केली आहेत. बेपत्ता मुलांचा शोध, आरोपींची ओळख आणि घटनेमागील सत्य उघड करण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.