पाटणादेवी येथील धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची प्राथमिक माहिती
वन विभाग आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम राबवली
काही वेळाच्या प्रयत्नांनंतर कृष्णाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला
पावसाळी दिवसात पर्यटन करायला प्रत्येकाला आवडत. त्यात विकेंड असेल तर सोन्याहून पिवळं. पर्यटकांना धबधब्यासारख्या ठिकाणी कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत पोहण्याचा आनंद लुटता येतो. धबधबधे, धरण, तलाव यासारख्या ठिकाणी पोहण्याचा मोह आवरता येत नाही. हाच मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला. जळगावातील चाळीसगाव तालुक्यातील प्रसिद्ध पाटणादेवी पर्यटनस्थळावर धवलतीर्थ धबधब्याच्या पाण्यात बुडून २३ वर्षीय कृष्णा संतोष गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा हा कन्नड येथील रहिवासी होता. धवलतीर्थ धबधब्याच्या परिसरात कृष्णा पाण्यात पोहत होता. पोहत असताना अचानक तो दिसेनासा झाला. नागरिकांनी शोधाशोध केल्यावर तो बुडाल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले.
वनपाल कैलास चव्हाण आणि राजाराम चव्हाण यांनी शोधमोहीम राबवत मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत केली. पोलिसांच्या पथकानेही घटनास्थळी पोहोचून आवश्यक कार्यवाही केली. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर कृष्णाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी चाळीसगाव येथील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आला. पोलिसांकडून घटनेची नोंद करण्यासह आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
पावसाळ्यात धबधबे आणि पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मात्र, पाण्याचा वाढलेला प्रवाह, घसरडे दगड आणि अचानक बदलणारी पाण्याची पातळी यामुळे अशा ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित अंतर राखावे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.