

Is Nitin Gadkari retiring from politics office explains his Nagpur statement : आता पूर्वीसारखं काम करणं शक्य नाही, नव्या पिढीला संधी दिली गेली पाहिजे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केलं होतं. त्यामुळं नितीन गडकरींनी राजकारणातून निवृत्त होत असल्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या चर्चांना उधाण आल्यानंतर काही तासांच्या आतच त्यांच्या कार्यालयातून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही, या वक्तव्याचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. त्यांच्या वक्तव्यातील मूळ संदर्भ हटवण्यात आला आणि ते दाखवण्यात आले, असे स्पष्टीकरण नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून देण्यात आले. कार्यालयानं दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, नागपुरात गडकरींनी लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचे भवितव्य आणि ती चालवण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यांच्या ट्रस्टमार्फत आदिवासी भागांत एकल विद्यालय सुरू आहेत. त्या संदर्भात बोलताना आधीसारखे आता जास्त काम करू शकत नाही. नव्या पिढीला अधिक जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली पाहिजे, असे वक्तव्य गडकरींनी केले होते.
नितीन गडकरींच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गडकरींची टिप्पणी ही ट्रस्टचे कामकाज आणि तिच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत करण्यात आली होती. प्रसारमाध्यमांनी त्यांचे वक्तव्य राजकीय टिप्पणीच्या स्वरुपात सादर केले. पण वास्तवात या वक्तव्याचा संदर्भ वेगळा होता, असे कार्यालयाने स्पष्ट केले.
नागपुरात रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी सार्वजनिक जीवनातील आपल्या अनेक दशकांच्या प्रवासाचा उल्लेख केला होता. या दरम्यान आपण अनेक चढ-उतार बघितले, तसेच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. अनेक मान-सन्मान मिळाले, असे गडकरी म्हणाले होते.
आता पूर्वीसारखे निरंतर आणि अधिक काम, मेहनत करणे शक्य नाही. नव्या पिढीने पुढे येऊन जबाबदारी सांभाळली पाहिजे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले होते. आपल्या आयुष्यात आणि कामाच्या पद्धतीत झालेल्या बदलांबाबतही उल्लेख त्यांनी केला होता. राजकारणात आल्यानंतर सुरुवातीच्या काळात पक्षासाठी काम करताना कोणत्याही परिस्थितीत काम करण्याची तयारी असायची. प्रवासात जे खायला मिळत होते, ते खात होतो. साधी राहणी असायची. पक्ष-संघटनेसाठी वेळेची पर्वा न करता काम करत होतो, असंही नितीन गडकरी म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.