

इराण-इस्रायल युद्धाचे पडसाद रायगड जिल्ह्यातही उमटले.
इंधन टंचाई आणि दरवाढीच्या भीतीने पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा.
काही पंपांवर पेट्रोलचा साठा संपल्याचे फलक.
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. राज्यातील रायगड जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातही युद्धाचा परिणाम जाणवतोय. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होईल. किमती गगनाला भिडतील, या भीतीने जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या प्रचंड रांगा लागल्यात. काही पेट्रोल पंपावर पेट्रोलचा साठा संपल्याचे फलक झळकल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये घबराट पसरली आहे.
पेट्रोल महाग होणार' अशा अफवांचे मेसेज सोशल मीडियावर पसरल्याने नागरिकांनी इंधन भरण्यासाठी एकच गर्दी केली आहे. यामुळे पंपांवरील साठा वेगाने संपत आहे. नियमित पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक नोकरदार आणि व्यावसायिक आपला दैनंदिन प्रवास कसा होणार, या काळजीत आहेत. ही कृत्रिम इंधन टंचाई कायम राहिल्यास वाहतुकीचा खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची भीती व्यक्त होतेय.
इंधन टंचाईच्या धास्तीमुळे सध्या पेट्रोल पंपांवर इंधनाचा कोटा मर्यादित करण्यात आला आहे. अनेक पंपांवर दुचाकीस्वारांना केवळ १०० ते १५० रुपयांचेच पेट्रोल दिले जात आहे. प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणास्तव पुकारलेल्या या अघोषित कपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काही नागरिकांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच इंधन टंचाईची चाहूल लागताच टाक्या फुल केल्या होत्या. मात्र आता ज्यांना तातडीची गरज आहे त्यांना केवळ मर्यादित पेट्रोल मिळत आहे. एवढ्याशा पेट्रोलवर दैनंदिन कामे कशी पूर्ण होणार? असा सवाल अमित निंबाळकर यांनी केलाय.
पेट्रोल अभावी आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी खासगी वाहने मिळणे कठीण झाले आहे. आपत्कालीन सेवेवर याचा मोठा परिणाम होतोय. तसेच काही पेट्रोल पंप चालक जाणीवपूर्वक साठा असूनही विक्री करत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. शासनाने अशा नफेखोर पंप चालकांवर कडक कारवाई करावी. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इंधनाचा पुरवठा सुरळीत करावा. टंचाई निर्माण करणाऱ्यांवर अंकुश ठेवावा, जेणेकरून सामान्य जनतेची होणारी गैरसोय थांबेल, असं पाली येथील नागरीक योगेश सुरावकर म्हणतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.