

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. आतापर्यंत 8 डब्यांसह धावणारी ही ट्रेन आता 16 डब्यांची होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गाडीतील प्रवाशांची आसनक्षमताही दुपटीने वाढणार आहे.
मुंबई सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस जून 2023 पासून प्रवाशांच्या सेवेत आहे. सुरुवातीपासूनच या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. अनेक प्रवाशांकडून या गाडीला पसंती दिली जातेय. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने या एक्स्प्रेसचे डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
9 नोव्हेंबर रोजी मुंबई सीएसएमटी-मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसची शेवटची 8 डब्यांची फेरी पूर्ण होणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबरपासून या मार्गावर 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस धावण्यास सुरुवात होईल. त्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आतापर्यंत 8 डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 530 प्रवाशांसाठी आसनांची व्यवस्था होती. मात्र, आता 16 डब्यांची ट्रेन सुरू झाल्यानंतर ही क्षमता वाढून 1,128 होणार आहे. म्हणजेच पूर्वीपेक्षा अधिक प्रवाशांना या ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे. पहिल्या दिवसापासूनच या गाडीला 100 टक्के आरक्षण मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकणात जाण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसशिवाय जनशताब्दी, तेजस, मंगळुरू, कोकणकन्या आणि मांडवी अशा अनेक एक्स्प्रेस गाड्या आहेत. मात्र या गाड्या अनेकदा वेळेवर धावत नसल्याची प्रवाशांची तक्रार असते. अशा परिस्थितीत वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता तिचे डबे वाढवण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
22229 डाऊन आणि 22230 अप मुंबई सीएसएमटी-मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवस धावते. मान्सूनचे वेळापत्रक संपल्यामुळे आता ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस प्रवाशांच्या सेवेत असणार आहे.
या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, थिविम आणि मडगाव या स्थानकांवर थांबा आहे. 16 डब्यांची ट्रेन सुरू होणार असली तरी तिच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आता अधिक आसनांसह पूर्वीच्याच वेळेत प्रवास करता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.