गोकुळच्या संचालकांनो, हजर व्हा! कोल्हापूर सर्किट बेंचचा महायुतीला झटका

Gokul Chairman Election: गोकुळ दूध संस्थेमध्ये विजय मिळवल्यानंतरही अध्यक्ष निवडीत समविचारी आघाडीला अडचणी आल्या. 13 विरुद्ध 12 च्या सत्तासंघर्षाला आता नवं वळण मिळालयं. कोर्टाने काय आदेश दिलेत ? गोकुळची अध्यक्ष निवडणूक किती तारखेला होणार? पाहूया एक खास रिपोर्ट....
GOKUL CHAIRMAN ELECTION ON NOVEMBER 10
GOKUL CHAIRMAN ELECTION ON NOVEMBER 10saam tv
Published On: 

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला आता नवं वळण मिळालंय. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी २९ ऑक्टोबर रोजी बोलवलेली सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली होती. मात्र बहुमतात असलेल्या सतेज पाटलांच्या समविचारी आघा़डीनं थेट शशिकांत चुवेकर यांची अध्यक्षांची निवड करून गैरहजर राहिलेल्या महायुतीला संचालकांना शह दिला. मात्र ही निवड बेकायदा असल्याचा दावा महायुतीनं केला. त्यामुळे समविचारी आघाडीनं थेट मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेतली. कोर्टानं संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर १० नोव्हेंबरला पुन्हा सभा घेऊन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे महायुतीला मोठा झटका बसलाय. कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला ते पाहूय़ात...

समविचारी आघाडीचे वकील– 29 ऑक्टोबरच्या बैठकीत 25 पैकी 13 संचालक उपस्थित असल्याने अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते, असे आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले. तरीही आमची बाजू ऐकून न घेता त्यांनी सभा तहकूब केली.

समविचारी आघाडीचे वकील–13 संचालकांनी शशिकांत चुयेकरांची अध्यक्षपदी निवड केली. ही निवड सहकार कायद्यातील तरतुदींनुसार आहे.

महायुतीचे वकील– गोकुळच्या उपविधी आणि सहकारी कायद्यानुसार 25 पैकी किमान 14 संचालक उपस्थित असणे आवश्यक आहे. त्यामुळे 13 संचालकांच्या उपस्थितीत कोरम पूर्ण होत नाही.

समविचारी आघाडीचे वकील – 13 विरुद्ध 12 असे संख्याबळ असताना अध्यक्षपदाची निवड कायदेशीर मानायला हवी. आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्जही मागितला. मात्र, कोरमचे कारण देत त्यांनी अर्ज दिला नाही.

कोर्ट – या सभेचे व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग झाले आहे का?

समविचारी आघाडीचे वकील – या पहिल्या सभेचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे.

सहकार प्राधिकरणाचे वकील – गोकुळ अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी आहेत. कोरमचा विचार करणे आवश्यक होते; मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे या निवडीला स्थगिती देऊन इतर संचालकांनाही संधी देणे गरजेचे आहे.

कोर्ट – गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्यामागचा नेमका उद्देश काय, याचाही विचार केला पाहिजे. कोरम हा नंतरचा विषय आहे. सुरुवातीला अध्यक्षांची निवड होणे गरजेचं.

महायुतीचे वकील – शनिवारी काढलेली नोटीस अद्याप 12 संचालकांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये. पुढील सभेची नोटीस काढून त्यांना 15 दिवसांची मुदत द्यावी.

कोर्ट – 10 नोव्हेंबर रोजी गोकुळ दूध संघाची पुन्हा सभा बोलावून अध्यक्षपदाची निवड करावी.

आधी निवडणुकीत, नंतर अध्यक्ष निवडीत आणि त्यानंतर कोर्टातल्या लढाईत सतेज पाटलांनी महायुतीतला तिसऱ्यांदा शह दिलाय. त्यामुळे आता कोर्टाच्या निर्देशानंतर तरी या सभेला महायुतीचे सर्व संचालक १० नोव्हेंबरला उपस्थित राहणार की आणखी काही तरी कायदेशीर पळवाट काढून गोकुळच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रखडत ठेवणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.