संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षाही गंभीर? कोल्हापुरात माजी सरंपच २ महिन्यांपासून बेपत्ता
माजी सरपंच महेश पिळणकर दोन महिन्यांपासून बेपत्ता
बेपत्ता झाल्यानंतर ८ दिवसांनी दुचाकी सापडली शेतात
कुटुंबीय आणि मित्रांनी कोल्हापुरातील दसरा चौकात केले आंदोलन
रणजीत माजगावकर, साम टीव्ही
कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश पिळणकर हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. पोलिसांनी विविध अंगाने तपास करूनही त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एखाद्या गंभीर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाली आहे का, अशी भीती व्यक्त होत आहे. दोन महिने उलटूनही काहीच धागेदोरे न लागल्याने आज कुटुंबीय आणि मित्रांनी कोल्हापुरात आंदोलन करत पोलिसांकडे तपासाला गती देण्याची मागणी केली. तसेच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने अनेकांच्या मनात संशय व्यक्त केला जात आहे.
हे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच राहिलेले महेश पिळणकर. गावातील राजकारणात सक्रिय असलेले महेश पिळणकर हे ७ जानेवारीपासून बेपत्ता आहेत.त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होऊन दोन महिने झाले तरी अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता झाल्यानंतर आठ दिवसांनी त्यांची दुचाकी परिसरातील एका शेतात सापडली. त्याच्याच पुढे काही अंतरावर काहीतरी जाळल्याच्या खुणा देखील पोलिसांना आढळल्या. मात्र या पलीकडे तपासात ठोस प्रगती झालेली नाही. त्यामुळे आज कुटुंबीय आणि मित्रांनी कोल्हापुरातील दसरा चौकात आंदोलन करत पोलिसांविरोधात निदर्शने केली आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेत तपासाची मागणी केली.
महेश पिळणकर यांचा परिसरातील राजकीय क्षेत्रात मोठा वावर होता. आगामी पंचायत समिती निवडणूक त्यांनी लढवावी असा आग्रहही त्यांच्या मित्रांकडून होत होता. त्यामुळे या प्रकरणामागे काही गंभीर कट तर नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे. काही मित्रांनी हे प्रकरण बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणा पेक्षाही गंभीर असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा या मागणीसाठी आज महेश पिळणकर यांचे कुटुंबीय आणि मित्रांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणासाठी स्वतंत्र अधिकारी नेमून विशेष पथक स्थापन करण्यात येईल आणि तपासाला गती दिली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही यात लक्ष घालावे, अशी मागणी पिळणकर यांच्या मित्रांकडून केली जात आहे. जर लवकरात लवकर या प्रकरणाचा उलगडा झाला नाही तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात एखाद्या गावचा माजी सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता असणे आणि अद्याप कोणताही ठोस तपास न लागणे ही गंभीर बाब मानली जात आहे. पोलिसांच्या तपासावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

