

परळी शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपचारातील हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. त्याचबरोबर या ह्रदयद्रावक घटनेनंतरही गांभीर्य न घेता केवळ अर्थिक लाभ उठवण्याच्या उद्देशाने या गरोदर मातेच्या पोटात तब्बल २२ तास मृत भ्रुण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या डॉक्टरच्या हलगर्जीने बाळ तर दगावलंच पण त्यानंतर या बाळाच्या मातेची प्रचंड हेळसांड करुन तिच्याही जीवाशी खेळ केल्याचा अमानवी आणि वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर लज्जास्पद प्रकार या डॉक्टरांनी केला आहे.
या प्रकरणात संबंधित डॉक्टरांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवण्यात आली आहे. कर्तव्यातील निष्काळजीपणा, बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणं आणि आईच्या जीवाशी गंभीर प्रकारे खेळ केल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकारानंतर वैजनाथ संभाजी मुंडे यांनी पोलीसांत धाव घेऊन खासगी रूग्णालयातील डॉक्टरांविरूद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीवर गेल्या काही महिन्यांपासून संबंधित डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. २३ एप्रिल रोजी अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तातडीने दवाखान्यात येण्यास सांगितले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतरही योग्य वेळी तपासणी व उपचार करण्यात आले नाहीत.
तसंच, सोनोग्राफीसाठी बाहेरील केंद्रावर पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी झालेल्या तपासणीनंतर गर्भातील बाळाची स्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं. तरीही रुग्णालयात वेळेत आवश्यक वैद्यकीय निर्णय न घेता विलंब करण्यात आला. दरम्यान, उपचाराच्या नावाखाली वारंवार पैसे मागण्यात आले.
डॉक्टरांच्या गंभीर निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाला, एवढंच नव्हे तर गरोदर महिलेच्या जीवावरही मोठा धोका निर्माण करण्यात आला. मृत बाळ पोटात असतानाही ते बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेली प्रसूती प्रक्रिया तब्बल २२ तास उशीराने करण्यात आली, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित डॉक्टरांनी निष्काळजीपणा करून रुग्णाच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप करत, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तसंच या प्रकरणाची वैद्यकीय आणि कायदेशीर चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणीही करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.