

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच विभागात हालचाल वाढल्याचं चित्र दिसून येतंय. अनेक दिवस कारवाईच्या नावाखाली केवळ कागदोपत्री काम करणारा विभाग आता प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचं नागपूरमधील धडक कारवाईतून स्पष्ट झालंय. मुंढे यांच्या निर्देशानंतर नागपूर जिल्ह्यातील विविध भागांत एफडीएच्या पथकांनी छापेमारी मोहीम राबवत भेसळीचा संशय असलेले मोठ्या प्रमाणातील अन्नसाठे जप्त केलेत.
सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत मसाले, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, पनीर, क्रीम आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले. एकूण सहा हजार किलो आणि लिटरपेक्षा अधिक अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत तब्बल ४ लाख ७२ हजार ५७० रुपये इतकी आहे.
एफडीएच्या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून संशयित अन्नपदार्थांची तपासणी केली. यामध्ये ३४ हजार ८०० रुपये किमतीची १ हजार १९६ किलो हळद आणि मिरची पावडर जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे ५४ हजार १८० रुपये किमतीचे चार हजार सहाशे लिटर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरही ताब्यात घेण्यात आलंय.
याशिवाय ५८ हजार २६० रुपये किमतीचे १९४ किलो क्रीम, १९ हजार २०० रुपये किमतीचं ६४ किलो पनीर आणि ६ हजार १३० रुपये किमतीचे इतर २५ किलो खाद्यपदार्थांचे नमुनेही तपासणीसाठी जप्त करण्यात आलेत. या सर्व नमुन्यांना प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आलं असून, अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली.
तुकाराम मुंढे यांच्या एन्ट्रीनंतर एफडीए विभाग अधिक एक्टिव्ह झाल्याची चर्चा सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. एरवी कारवाईच्या नावाखाली केवळ लिपापोती करणारा विभाग आता प्रत्यक्ष धडक मोहिमा राबवताना दिसत असल्याने भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. येत्या काळात अशाच प्रकारच्या आणखी कडक कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.