Solapur drought : १०० एकर जमिनीचा मालक, पण लग्नासाठी पोरगी मिळेना! सोलापूरमधील तरुणांची भीषण शोकांतिका

Solapur drought : सोलापूरच्या माढा तालुक्यातील तुळशी गावात पाणीटंचाईचा गंभीर परिणाम तरुणांच्या लग्नावर झाला आहे. १०७ एकर जमीन असूनही राहुल गव्हाणे यांचे लग्न जुळत नसल्याची व्यथा समोर आली आहे.
Solapur drought affecting marriages
Solapur drought affecting marriages
Published On: 

भरत नागणे, पंढरपूर प्रतिनिधी

Solapur drought affecting marriages : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाने आता केवळ शेतीच नव्हे, तर गावाचा वैवाहिक समतोलही पूर्णपणे बिघडवला आहे. माढा तालुक्यातील तुळशी गावात पाणी नाही म्हणून शेकडो तरुणांची लग्ने रखडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल १०७ एकर जमिनीचा मालक असूनही मुलगी मिळत नसल्याची हतबल कहाणी एका तरुणाने मांडली आहे.

दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या माढा तालुक्यातील तुळशी गावातून एक अत्यंत गंभीर सामाजिक समस्या समोर आली आहे. गावात पाणी नाही म्हणून या गावातील तरुणांना कोणी मुलगी द्यायला तयार नाही. याच गावातील राहुल गव्हाणे हा तरुण याचे जिवंत उदाहरण आहे. राहुलचे वय ३५ वर्षे ओलांडले आहे, त्याच्याकडे १०७ एकर जमीन, स्वतःचे घरदार आणि चांगला जमीन-जुमला आहे; मात्र तरीही त्याचे लग्न जुळत नाहीये. उच्चशिक्षित आणि 'आयटीआय' (ITI) डिप्लोमा केलेला राहुल पूर्वी पुण्यात १६ हजार रुपयांच्या नोकरीवर होता. परंतु शेती सांभाळण्यासाठी तो नोकरी सोडून गावात परतला; मात्र आता पाण्याअभावी त्याला कोणीही मुलगी द्यायला तयार नाही.

Solapur drought affecting marriages
Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

आपली व्यथा मांडताना राहुल सांगतो, "माझ्याकडे १०७ एकर जमीन आहे, मी उच्चशिक्षित आहे, पण गावात पाणी नाही म्हणून माझे लग्न होत नाही. पाहुणे येतात, शेतजमीन बघतात आणि नंतर फोनच करत नाहीत. माझ्यासारख्याची ही अवस्था असेल तर गोरगरीब मुलांचे काय होणार? सरकारने आमचे गाव विकत तरी घ्यावे किंवा आम्हाला पाणी तरी द्यावे..."

विशेष म्हणजे, राहुल हा या गावात एकटा नाही. तुळशी गावातील ४०० ते ५०० तरुणांचे वय आज ३०, ३५ ते ४० वर्षे उलटून गेले तरी ते अविवाहित आहेत. गावात पाणी नाही आणि शेती पिकत नाही, म्हणून बाहेरगावचे लोक तुळशी गावाला 'भुकाड गाव' म्हणून हिणवतात. त्यामुळे या गावात मुलगी देण्यास स्पष्ट नकार दिला जातो. आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेले गव्हाणे कुटुंब सध्या या दुष्काळासोबतच कौटुंबिक व सामाजिक विषमतेच्या दाहकतेने होरपळून निघत आहे. लग्न जुळत नसल्यामुळे अनेक तरुणांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरला आहे.

Solapur drought affecting marriages
आजोबा-पणजोबांची जमीन नक्की कुठे अन् किती आहे? एका क्लिकवर शोधा ७/१२ अन् जमिनीचा नकाशा

"पाण्यावाचून मुलांची लग्ने होईनात, हीच या भागातील सर्वात मोठी शोकांतिका आहे..."

एकीकडे सरकार दुष्काळमुक्तीचे मोठे दावे करत असताना, दुसरीकडे पाण्याअभावी गावाचा वैवाहिक समतोलच ढासळला आहे. दुष्काळामुळे शेतीसोबतच संपूर्ण कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. काही दिवसांपूर्वी तुळशी गावाने 'गाव विकणे आहे' असे फलक लावले होते; त्यामागे केवळ पाण्याचा प्रश्न नव्हता, तर लग्नासारखा गंभीर सामाजिक प्रश्नही दडलेला होता, हे राहुलच्या कहाणीवरून स्पष्ट होत आहे.

दुष्काळाची ही दाहकता केवळ पिकांपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती आता थेट कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यामुळे तुळशी गावातील या तरुणांच्या गंभीर व्यथेकडे राज्य सरकारने तातडीने व गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com