विनायक वंजारे, साम टीव्ही
कोकणचा राजा म्हणून ओळख असलेल्या हापूस आंब्याच्या हंगामाची चाहूल यंदा चक्क ऑक्टोबर महिन्यातच लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून यंदाच्या हंगामातील हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटच्या दिशेने रवाना झाली आहे. देवगडमधील गिर्ये-रामेश्वर येथील प्रगतशील आंबा बागायतदार मिलेश बांदकर यांनी ऑक्टोबर महिन्यातच हापूसचे उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. संकष्टीच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या हापूस आंब्यांची ही पहिली पेटी शुक्रवारी वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल होणार आहे.
विशेष म्हणजे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आणखी सहा ते सात पेट्या बाजारात पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हंगामाच्या कित्येक महिने आधी बाजारात दाखल होणाऱ्या या देवगड हापूसला किती दर मिळतो, याकडे आता आंबा बागायतदारांसह व्यापाऱ्यांचेही लक्ष लागले आहे. देवगड हापूस म्हटलं की त्याचा वैशिष्ट्यपूर्ण सुगंध, रंग आणि अवीट चव डोळ्यासमोर येते. साधारणपणे हापूस आंब्याचा मुख्य हंगाम उन्हाळ्यात सुरू होतो. मात्र, यंदा देवगड तालुक्यातील गिर्ये-रामेश्वर येथील प्रगतशील बागायतदार मिलेश बांदकर यांच्या बागेत ऑक्टोबर महिन्यातच हापूस आंबा तयार झाला आहे.
त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वीच देवगड हापूसची पहिली पेटी मुंबईच्या वाशी मार्केटकडे रवाना करण्यात आली आहे. आंबा उत्पादनामध्ये हवामान योग्य असनं गरजेच असतं. सुरूवातीला आलेला मोहोर टीकवणं महत्त्वाचं असत. त्यानंतर फळधारणा होणे आणि फळांची योग्य वाढ होणे या सर्व टप्प्यांवर हवामानाचा परिणाम होत असतो. मिलेश बांदकर यांनी आपल्या बागेतील आंबा झाडांची योग्य निगा राखत ऑक्टोबर महिन्यातच दर्जेदार हापूस आंब्याचे उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे.
संकष्टीच्या शुभमुहूर्तावर झाडावरील परिपक्व आंब्यांची काढणी करण्यात आली. त्यानंतर आंब्यांची निवड आणि पॅकिंग करून हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटसाठी रवाना करण्यात आली आहे. ही पेटी शुक्रवारी वाशीच्या बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहे. विशेष म्हणजे ही केवळ सुरुवात असून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर देवगड हापूसच्या आणखी सहा ते सात पेट्या वाशी मार्केटमध्ये पाठवण्याचे नियोजन मिलेश बांदकर यांनी केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात ग्राहकांना कोकणच्या राजाची चव चाखायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.