चंद्रपूर काँग्रेसमध्ये धानोरकर-वडेट्टीवार संघर्ष तीव्र झाला आहे.
दोन्ही गटांनी स्वतंत्र व्हीप जारी केल्याने नगरसेवक संभ्रमात पडले आहेत.
प्रतिभा धानोरकर समर्थक गटाने गटनेता बदलण्यासाठी बैठक बोलावली.
खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक गटाने विद्यमान गटनेता बदलण्यासाठी आज १५ जून रोजी बैठक बोलावली असताना, त्याला प्रत्युत्तर म्हणून वडेट्टीवार समर्थक गटनेते राजेश अडूर यांनी काल १४ जून रोजी तातडीची बैठक बोलावून पक्षाचा ‘व्हिप’ जारी केला होता. मात्र कालच्या बैठकीला 27 पैकी केवळ अकरा सदस्यच हजर होते. दोन्ही बाजूंनी कायदेशीर कारवाई तसेच अपात्रतेचे इशारे दिल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक अक्षरशः कोंडीत सापडले असून, त्यांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे.
गटनेता बदलाच्या या राजकीय ‘ऑपरेशन’मुळे गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. धानोरकर समर्थक १५ नगरसेवक यवतमाळ येथील एका रिसॉर्टमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर धानोरकर गटाकडून काँग्रेस नगरसेवकांच्या घरांवर बैठकीच्या नोटिसा चिकटवण्यात आल्या. या ‘लेटर बॉम्ब’ला प्रत्युत्तर देताना गटनेते राजेश अडूर यांनीही सर्व २७ नगरसेवकांना पत्र पाठवून १४ जूनच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
दोन्ही गटांकडून जारी करण्यात आलेल्या पत्रांमुळे नगरसेवकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. राजेश अडूर यांनी जारी केलेल्या पत्रात १५ जून रोजी बोलावण्यात आलेली बैठक बेकायदेशीर व अवैध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्या बैठकीला उपस्थित राहू नये तसेच कोणत्याही ठरावावर स्वाक्षरी करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, १४ जून रोजी होणाऱ्या अधिकृत बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांवर थेट अपात्रतेची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या ‘व्हिप’मुळे नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, कोणत्या गटाच्या बैठकीला उपस्थित राहायचे याबाबत ते द्विधा मनःस्थितीत आहेत. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी मनपातील गटनेता निवडीच्या वेळीही असाच संघर्ष उफाळून आला होता. त्यावेळी हा वाद नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयापासून थेट दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला होता. अखेर वडेट्टीवार गटाच्या राजेश अडूर यांना गटनेतेपद आणि धानोरकर गटाला महापौरपदाच्या उमेदवारीवर समाधान मानावे लागले होते. मात्र अवघ्या चार महिन्यांतच हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.